जळगाव : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन-चार दिवसांतच सोन्याने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडले असून, चांदीच्या दरानेही विक्रमी पातळी गाठली आहे. गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर आला असताना सोन्याची प्रतितोळा ७५ हजारांकडे वाटचाल सुरू आहे. जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती, सोन्याला वाढलेल्या मागणीसह त्यात वाढलेली गुंतवणूक ही दरवाढीची कारणे सराफ व्यावसायिकांकडून सांगितली जातात.

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात एक एप्रिलला सोने-चांदीतील दरवाढ कायम राहून सोन्याच्या दरात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याने प्रतितोळा दराने ६९ हजार ४०० रुपयांपर्यंत पातळी गाठून प्रतितोळा दर जीएसटीसह ७१ हजार ४८२ रुपयांपर्यंत पोहचले होते. एक मार्चला हेच दर ६३ हजार १०० रुपये होते. चांदीचे दर एक एप्रिलला प्रतिकिलो ७६ हजार रुपये होते. सराफ बाजारात सोने आणि चांदीची घोडदौड सुरूच राहिल्यामुळे ग्राहकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. एप्रिलच्या चार दिवसांतच सोने दरात प्रतितोळा ६०० रुपये, तर चांदी दरात प्रतिकिलो दोन हजारांची वाढ झाली. शुक्रवारी सोने प्रतितोळा दर ७२ हजारांपर्यंत, तर चांदी प्रतिकिलो दर ८० हजारांपर्यंत होते.

हेही वाचा : “एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा…”, गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

दर वाढले असले तरी सद्यःस्थितीत लग्नसराई व गुढीपाडव्याच्या निमित्ताने होणार्‍या खरेदीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे सराफ व्यावसायिक कपिल खोंडे यांचे म्हणणे आहे. गुंतवणूक केलेल्या सर्वसामान्यांकडून सोने मोडतानाही दिसून येत असून, त्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

हेही वाचा : नाशिक: मतदारसंघातील प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान, मविआ बैठकीत निर्णय

जागतिक स्तरावर युक्रेन, रशिरा, इराक, इराण, इस्त्राईल यांसह इतर देशांत युद्धजन्य परिस्थिती आणि सोन्याला असलेली मागणी, सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक, अशी दरवाढ होण्याची कारणे आहेत. सोन्या-चांदीतील दरवाढ आगामी काळातही कायम राहणार असून, सोने प्रतितोळा दर ७५ ते ७६ हजारांपर्यंत पातळी गाठेल. दर कमी झालेच तर फक्त २०० ते ५०० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

अजयकुमार ललवाणी (अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार संघटना)