जळगाव – जिल्ह्यातील मन्याड धरणाने अतिवृष्टीनंतर रविवारी दुपारी धोक्याची पातळी ओलांडली. जोरदार प्रवाहामुळे धरणाच्या उजव्या तंटबंदीचे नुकसान झाल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी नागरिकांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात एकूण २२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली. पैकी चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक सात मंडळात अतिवृष्टी झाली असून, चार मंडळात तर १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. पाचोरा आणि भडगाव तालुक्यातही आठ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे गिरणा आणि मन्याड व इतर बऱ्याच नद्यांना मोठे पूर आले आहेत. पैकी मन्याड नदीवरील सिंचन प्रकल्प तुडूंब भरल्यानंतर ओसंडून वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढतच असल्याने मन्याड प्रकल्पाच्या उजव्या तटबंदीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, गिरणा आणि मन्याड नद्यांच्या संगमावर वसलेल्या सायगावला तसेच मन्याड धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या नांद्रे गावाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. तसेच पूर परिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने खबरदारीच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे सांगण्यात आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर, सपूर्ण नांद्रे गाव स्थलांतरीत करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या.

जिल्हा प्रशासनाने नद्यांच्या पुरामुळे प्रभावित गावातील सर्व नागरिक आणि जनावरे यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे बंधनकारक केले आहे. शाळा, मंगल कार्यालये आणि सार्वजनिक इमारतींमध्ये तात्पुरती आश्रयस्थाने निर्माण करण्यात आली आहेत. ज्याठिकाणी अन्न, पाणी आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्भवती महिलांपैकी अंतिम तिमाहीतील सर्व महिलांना सुरक्षिततेसाठी योग्य वैद्यकीय सोयी असलेल्या जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे निर्देश दिले आहेत. लहान मुले, वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. महसूल, पोलीस, सिंचन आणि ग्रामपंचायत विभागातील सर्व अधिकारी आप्तकालीन कार्यवाहीमध्ये सहभागी झाले आहेत.