जळगाव – तालुक्यातील नशिराबाद येथील एका विवाहितेने सहा वर्षाच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली भादली पुलाजवळ आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
मनीषा चंद्रकांत कावळे (२८) आणि गौरी चंद्रकांत कावळे (सहा) अशी मृतांची नावे आहेत. नशिराबाद येथील भवानी नगर परिसरात मनीषा कावळे या पती चंद्रकांत आणि दोन मुलींसह वास्तव्यास होत्या. चंद्रकांत कावळे हे जळगावमधील औद्योगिक वसाहतीत एका एका चटई निर्मिती कंपनीत रोजंदारीने काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पती घरी असतानाच मनीषा गावातील एका परिचित महिलेकडून रेशनचा तांदूळ आणायचा आहे, असे सांगून लहान मुलगी गौरीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. मात्र, आई आणि मुलगी सायंकाळ झाली तरी घरी न परतल्याने कावळे कुटुंबियांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे विचारपूस केली. मात्र, दोघींचा कुठेच तपास लागला नाही.
दरम्यान, मनमाड-भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली पुलाजवळ एका महिलेचा लहान मुलीसह छिन्नविछीन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना सायंकाळी उशिरा मिळाली. हवालदार रूपेश साळवे खात्री करण्यासाठी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. कावळे कुटुंबियांकडून ओळख पटविण्यात आली असता, मृतदेह मनीषा आणि गौरी यांचे असल्याचे दिसून आले.
पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात रवाना करण्यात आले. मंगळवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे हे मनीषा कावळे आणि गौरी कावळे यांच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास करीत आहेत.