जळगाव : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह दोन संशयित पळून गेल्याची घटना अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथे दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. बेड्यांसह रफूचक्कर झालेल्या दोन्ही संशयितांचा अद्याप शोध लागलेला नाही.

अमळनेरसह जामनेर शहरातून जनावरे चोरल्याचा आरोप असलेले संशयित शाकीर शाह (३०, सुप्रीम कॉलनी, जळगाव) आणि अमजद कुरेशी (३५, रा. मेहरूण, जळगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील आणि राहुल कोळी हे गाडीतून अमळनेरला घेऊन जात होते. वाटेत चांदणी कुऱ्हे गावाजवळील रेल्वे बोगद्याखाली पोलिसांच्या गाडीचा वेग कमी होताच दोन्ही संशयितांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, दोघे कुठेच सापडले नाही.

एकूण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अखेर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत पळून गेलेले दोन्ही संशयित थेट दिल्लीत गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारण, पसार झालेल्या एका संशयिताची पत्नी दिल्ली येथे राहते. त्यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शशिकांत पाटील नवीन निरीक्षक

जळगाव शहरालगत बोगस कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे सध्या नाशिक येथील कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, कोल्हे यांना खास वागणूक देण्यासह बोगस कॉल सेंटरकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी नवीन प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांची आता नियुक्ती केली गेली आहे. यासंदर्भात आदेश पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी काढले आहेत. पाटील हे चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

वाळू माफियांसह अवैध धंदे चालविणाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या तालुका पोलीस ठाण्याचा कारभार बोगस कॉल सेंटर प्रकरणामुळे चव्हाट्यावर आल्याने नागरिकांनीही सखेद आश्चर्य व्यक्त होते. माजी महापौर कोल्हे हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे कोठडीत असताना कोल्हे यांना खास वागणूक देण्यात यावी म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संजय गायकवाड यांच्यावर राजकीय दबाव आणला गेल्याची शक्यता व्यक्त झाली होती. पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तशी चर्चाही ऐकण्यास मिळाली होती.