जळगाव – जिल्ह्यात शेती उपयोगी साहित्य, तोल काट्यावरील बॅटरी, मोटार तसेच दुचाकी चोरीच्या घटना काही दिवसांपासून सातत्याने घडत असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी निंभोरा (ता. रावेर) पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांनी सुमारे १२ लाख रुपयांच्या मुद्देमालासह १० सशयितांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १० गुन्ह्यांची उकल देखील झाली आहे.
निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरवड्यापासून पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार साखळी पद्धतीने नाकाबंदी, रात्रगस्त आणि तांत्रिक तपासणी सुरू केली होती. याच दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे या संशयिताचा शोध घेतला. मात्र, पोलीस हालचालीची खबर मिळताच तो पसार झाला. त्याच्या घरावर छापा टाकला असता, तेथे त्याची सहकारी महिला योगिता कोळी हाती लागली. तिची कसून चौकशी करून पोलिसांना चोरीचा माल खरेदी करणारा प्रमुख सूत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी याचा ठावठिकाणा मिळाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची आणि गोदामाची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणावर चोरीचा साठा आढळून आला.
या प्रकरणातील मुख्य संशयित विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे हा अद्याप फरार असला, तरी पोलिसांनी त्याचे साथीदार आणि चोरीचा माल बाळगणारे तसेच विक्री करणारे असे तब्बल १० संशयित ताब्यात घेतले आहेत. योगिता सुनील कोळी, गोपाल संजय भोलनकर, आकाश मधुकर घोटकर, अर्जुन रतनसिंग सोळंकी, जमील अब्दुल तडवी, स्वप्नील वासुदेव चौधरी, राकेश सुभान तडवी, ललित सुनील पाटील आणि राहुल ऊर्फ मयूर अनिल पाटील यांचा त्यात समावेश आहे. संबंधितांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात शेतीसाठी लागणारे साहित्य, पाच टी.पी. पंप, ११ मोठ्या आणि तीन लहान बॅटरी, सात इन्व्हर्टर, चार दुचाकी, दोन पॉवर ट्रॅक्टर, एक मोटार, दोन सोलर प्लेट, ११ मटेरियल बॅग आणि ठिबक नळ्यांची तीन बंडले, असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने ही धडक कारवाई यशस्वीपणे पार पाडली. या मोहिमेत उपनिरीक्षक दीपाली पाटील, ममता तडवी, पोहेकॉ. सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, पोना. अविनाश पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सोपान गोरे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कामगिरीबद्दल शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.