जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत रक्षाबंधनाच्या सणापूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर उच्चांकी प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यांनतर मंगळवारी हरितालिकेला पुन्हा सोन्याचे दर लक्षणीय वधारले. ज्या कारणाने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या निर्णयाचा परिणाम थेट सोन्याच्या बाजारावर दिसून आला असून, किमतींमध्ये मोठी तेजी नोंदवली गेली आहे. दरम्यान, फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तथापि, महागाईची भीती अजूनही कायम असल्याने बाजारात काहीअंशी सावध वातावरण आहे. फ्युचर्स मार्केटच्या अंदाजानुसार फेड पुढील बैठकीत व्याजदर कपात करेल. त्यामुळे येत्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या अमेरिकन महागाईच्या आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अहवाल सोने-चांदीच्या किमतींच्या पुढील प्रवासासाठी निर्णायक घटक ठरणार आहे.

तूर्त सोने-चांदीच्या बाजारात अस्थिरतेचा काळ कायम आहे. सोमवारी दिवसभर किमती स्थिर राहिल्यानंतर मंगळवारी या दोन्ही धातूंमध्ये संमिश्र कल दिसून आला. सोन्याच्या दरात ८०० रूपयांची वाढ नोंदली गेली असताना, चांदीची किंमत मात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थिर राहिली. तीन दिवसांपूर्वी चांदीत चांगली तेजी पाहायला मिळाली होती. सराफा तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडींतील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा सतत बदलणारा कल हा किमतीतील चढ-उताराचे मुख्य कारण ठरत आहे. त्यामुळे भविष्यातही सोने आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये अस्थिरतेचा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्यापेक्षा चांदीची मागणी अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांसाठी सोने आणि चांदी या सर्वाधिक सुरक्षित गुंतवणुकीच्या साधनांपैकी एक मानल्या जातात. त्यांची मागणी वाढवणारे नवे मार्ग देखील निर्माण होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः चांदीसाठी मागणी वाढती राहील, तर सोन्यात स्थिरतेचा काळ येण्याची शक्यता आहे.

टॅरिफ वॉरमध्ये झालेली शिथिलता, व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि मध्यवर्ती बँकांची धोरणे या सर्व घटकांमुळे अलीकडील काळात सोने-चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. जळगावमध्येही सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख तीन हजार ७२१ रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजार उघडताच प्रति १० ग्रॅम ८१५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख चार हजार ५३६ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.

चांदीचे दर स्थिर

जळगावमध्ये चांदीचे दर तीन दिवसांपूर्वी अचानक तीन हजार रूपयांनी वधारून एक लाख २१ हजार ५४० रूपयांपर्यंत पोहोचले होते. तेव्हापासून चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आलेली नाही. हरितालिकेच्या दिवशीही चांदीचे दर स्थिर राहिले. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.