मालेगाव : तहसीलदारांच्या नावाने बनावट आदेश बनवून येथील महापालिकेतून बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करणाऱ्या सर्व १०४४ लाभार्थ्यांना अटक करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येथे केली आहे.

विलंबाने जन्म प्रमाणपत्रे देण्याच्या कार्यपद्धतीनुसार मालेगावातून सुमारे चार हजार जणांनी बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केली असून त्यात काही बांगलादेशी घुसखोरांचा समावेश असल्याचा आरोप सोमय्या हे सातत्याने करीत आहेत. मंगळवारी यासंदर्भात पुन्हा त्यांनी मालेगावला भेट दिली. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांच्याशी चर्चा करुन नंतर किल्ला पोलीस ठाण्यात अपर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग संधू यांची भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत किल्ला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी आपण पुरावे दिले असून जन्म प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सर्व लाभार्थ्यांवर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अल्पसंख्यांक सुरक्षा समितीचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख आणि मुस्तकीम डिग्निटी यांनी कुठल्याही पदावर नसताना सोमय्या यांना पालिका प्रशासनाकडून अवास्तव महत्त्व का दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. मालेगावची बदनामी करणारी सोमय्या यांची भूमिका आणि प्रशासनाकडून चालविले जाणारे त्यांचे लाड याचा निषेध करण्यासाठी १४ जुलै रोजी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.