मालेगाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा सध्या राज्यभर गाजत आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय पातळीवरून बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ज्यांची जन्म प्रमाणपत्रे रद्द गेली गेली,अशा मालेगावातील ३२७३ लोकांची मतदार यादीतील नावे देखील वगळण्यात यावी, यासाठी सोमय्या यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र पाठवून संबंधितांची मतदार यादीतील नावे वगळण्याचा आग्रह धरला आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात मालेगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा जाहीर केला होता. शहरात ४ हजारावर अर्जदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विलंबाने जन्म प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून आदेश प्राप्त केले. तसेच या आदेशांच्या आधारे महापालिकेकडून बोगस जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केली. अशी प्रमाणपत्रे प्राप्त करणारे बांगलादेशी,रोहिंगे घुसखोर असल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे.

सोमय्या यांच्याच पाठपुराव्यानंतर याप्रकरणी मालेगावात फसवणुकीचे वेगवेगळे पाच गुन्हे दाखल झाले असून ५३९ संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात आले आहेत. त्यात तहसील कार्यालय व महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी,अर्जदार,वकील व दलालांचा समावेश आहे. त्यातील काही संशयित सध्या तुरुंगात आहेत. बांगलादेशी व रोहिंगे घुसखोरांनी जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केली,अशी तक्रार प्राप्त झाल्याने राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आणि नाशिकच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी ) या प्रकरणाची चौकशी करवून घेतली.

मालेगावातील बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील अन्य शहरातही याचीच पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले. त्यानुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार राज्यभरात जवळपास ४७ हजार लाभार्थ्यांनी अशाप्रकारे बोगस जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केले आहेत. बोगस प्रमाणपत्रे मिळवणाऱ्या अशा सर्वांची प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई यापूर्वीच झालेली आहे. तसेच या अपात्र अर्जदारांनी जन्म तारीख बदलण्यासाठी आधार कार्ड प्राधिकरणाकडे अर्ज केला असता, त्यांची आधार नोंदणीही अलीकडेच प्राधिकरणाकडून रद्द केली गेल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी सर्व प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मालेगाव महानगरपालिकेने ३२७३ जणांचे जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय सरकारी सेवा पोर्टलच्या नागरी नोंदणी प्रणालीवरून (सीआरएस) देखील ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती मालेगाव महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केलेली जन्म प्रमाणपत्रे आणि आधार कार्ड रद्द झालेल्या लोकांचा भारतात जन्म झाल्यासंबंधी कोणताही ठावठिकाणा सापडत नसल्याचा सूर लावत त्यामुळे मतदार यादीतील त्यांची नावे वगळण्यात यावीत,अशी मागणी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे केली आहे.