मालेगाव : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा भरणार आहे. या कुंभमेळ्यात केवळ हिंदू व्यावसायिकांचीच दुकाने लागली पाहिजेत. कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकाने अजिबात नकोत, अशी भूमिका मत्स्य व्यवसाय मंत्री व भाजपा नेते नितेश राणे यांनी घेतली आहे. त्यावर मालेगावात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इस्लाम पार्टीचे संस्थापक व माजी आमदार आसिफ शेख यांनी राणे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. राणे यांचे हे बेताल वक्तव्य घटनाविरोधी आहे. ते मुद्दाम अशी वक्तव्ये करीत असतात. या वक्तव्याबद्दल खरे तर सरकारने त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे, असे मत शेख यांनी मांडले.

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. या पर्वणीच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात जी दुकाने थाटण्यात येतील, त्यात मुस्लिमांना जागा देऊ नये, असा आग्रह राणे यांनी धरला होता‌. गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले असताना राणे यांनी ही भूमिका मांडली होती. कुंभमेळ्यात मुस्लिमांना दुकानांसाठी जागा का देऊ नये, याचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न त्यांनी यावेळी केला होता. मुस्लिम नागरिक मूर्तिपूजा मानत नाही. त्या धर्मात मूर्तिपूजेला स्थान नाही. हिंदू धर्माला देखील त्यांची मान्यता नाही. इतरांचे नियम आणि धर्म मान्य नसल्याने त्यांचे सिंहस्थ कुंभमेळ्यात काय काम,असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.

कुंभमेळा हा हिंदूंचा धार्मिक उत्सव आहे. त्यामुळे त्यात केवळ हिंदू व्यावसायिकांनाच दुकाने थाटण्याची परवानगी असायला हवी. दुकानांवर हिंदू देव-देवतांची नावे टाकून मुस्लिम लोक अशा उत्सवांमध्ये व्यवसाय करीत असतात. कुंभमेळ्यातही असेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळले पाहिजे, त्यासाठी साधुसंतांनी देखील सतर्क राहायला हवे,असे मंत्री राणे म्हणाले. राणे यांच्या या वक्तव्याबद्दल मालेगावातील मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इस्लाम’ या स्थानिक पार्टीची शहरात जाहीर सभा पार पडली. या सभेत राणे यांच्या भूमिकेबद्दल नापसंती व्यक्त करत तीव्र स्वरूपाची टीका करण्यात आली.

या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना देखील आसिफ शेख यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला. कुंभमेळ्यात मुस्लिम व्यावसायिकांच्या दुकानांना विरोध करणे हे केवळ मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंच्या दुकानातून मुस्लिम खरेदी करू शकतो, आणि मुस्लिमांच्या दुकानातून हिंदू वस्तू खरेदी करू शकतो. भारतीय घटनेनुसार मुस्लिमांना दुकाने थाटण्यास विरोध करण्याचा कायदा करता येऊ शकत नाही‌. त्यामुळे राणे यांची विधान घटनाविरोधी ठरते. मंत्री म्हणून राणे यांनी जी शपथ घेतली, त्या शपथेचीही त्यामुळे उल्लंघन होत असल्याचे मत शेख यांनी मांडले. दिपवाळीच्या वेळेस अहिल्यानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील मुस्लिमांच्या दुकानातून हिंदूंनी खरेदी करू नये, असे वक्तव्य केले होते, याकडे लक्ष वेधत अशी वक्तव्य करण्यामागे दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न असल्याची टीका शेख यांनी केली.