नाशिक – नाशिकसह जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांचा संचार आणि हल्ले वाढले आहेत. नाशिक तालुक्यातील वडनेर दुमाला, देवळाली कॅम्प, विहितगाव या परिसरात मागील दोन महिन्यात बिबट्याचे हल्ले अधिक झाले. देवळा तालुक्यातही दोन दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले. असाच प्रकार इगतपुरी तालुक्यातही शनिवारी रात्री घडला. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
शुक्रवारी देवळा तालुक्यातील भवरी मळा-रामननर रस्त्याने सुनील ठाकरे (४८) आणि त्यांचा मुलगा किशोर (१९) मोटारसायकलने शेतात जात असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दोघे जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी त्यांना दहिवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पवार यांनी जखमींवर उपचार करून घरी पाठविले. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, याअगोदर बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले.
धावत्या मोटारसायकलवर बिबट्याने हल्ला करण्याच्या या प्रकाराची नाशिक जिल्ह्यात चर्चा सुरु असतानाच शनिवारी रात्री तसाच प्रकार इगतपुरी तालुक्यात घडला. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, सांजेगाव, मुरंबी, मोडाळे या परिसरात बिबट्याचा अधिक वावर आहे. या भागात दररोज कोणाला ना कोणाला बिबट्या दिसतो. परिसरात किमान १० पेक्षा अधिक बिबटे असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हे जवळील भवानी मंदिरामागील बाजूला मुरंबी- सांजेगाव रस्त्याने काम आवरून धनंजय शिंदे (३०), आणि उत्तम शिंदे (३०) हे दोन युवक मोटारसायकलने घराकडे जात होते. त्यांच्या धावत्या मोटारसायकलवर बिबट्याने झेप घेतली. बिबट्याने झेप घेतल्यामुळे मोटारसायकल चारीत पडले. दोघे युवक खाली पडलेले असताना बिबट्याने धनंजय याला तोंडात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये धनंजयच्या हाताला व पायाला बिबट्याने चावा घेतल्याने जखमा झाल्या. दुसरा युवक उत्तम हाही जखमी झाला. त्याचवेळी मागून येणाऱ्या डॉ. योगेश मते यांच्या चारचाकी वाहनाच्या आवाजामुळे बिबट्या पळाला. दोन्ही जखमी युवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील दहेगाव रस्त्यावर असलेल्या जाधववाडी येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच शेतकऱ्यांच्या बकऱ्या फस्त केल्या होत्या. इगतपुरी तालुक्यात मुकणे धरण,वाडीवऱ्हे पाझर तलाव,आणि वालदेवी धरण असा पाण्याचा मोठा परिसर असून या परिसरात काही वर्षांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे.अनेक वेळा शेतकऱ्यांवर त्याने हल्ले केले आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरे लावून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.