लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमाड: धावत्या रेल्वे गाडीत प्रवाशांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन त्यांचे किंमती भ्रमणध्वनी आणि सामान चोरीच्या घटना नेहमीच घडतात. कधी त्या उघडकीस येतात, कधी प्रवासी तक्रार न देताच निघून जातात. पण मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने गेल्या काही महिन्यांत घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांसह एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणून संशयितांना जेरबंद केले. या सर्व प्रकारात चार लाख २८ हजार ९९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

चोरीच्या गुन्ह्यांच्या विरोधात लोहमार्ग पोलीस कमालीचे सक्रिय झाले आहेत. एका गुन्ह्यात तक्रारदार महिला प्रवासी या मार्च महिन्यात पुणे ते काजीपेठ या गाडीने गार्ड बोगीच्या शेजारील सर्वसाधारण बोगीतून प्रवास करत होत्या कोपरगाव रेल्वे स्थानक येथून गाडी सुटल्यानंतर एका चोराने या महिलेचा आठ हजार रुपये किंमतीचा भ्रमणध्वनी खिडकीतून हात टाकून लंपास केला. या महिलेने भुसावळ रेल्वे स्थानकात याबाबत तक्रार दिली होती. हा गुन्हा मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

हेही वाचा… नाशिक: लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यासह तिघे ताब्यात

लोहमार्ग पोलिसांनी गांभिर्याने दखल घेत एका भ्रमणध्वनीची माहिती प्राप्त करीत त्यावरून मूळ आरोपीचा शोध घेतला. या प्रकरणी कोपरगाव येथील अविनाश घुले (शिंगणापूर) याला अटक करण्यात आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आणखी सहा भ्रमणध्वनी विकल्याचे निष्पन्न झाले. हे भ्रमणध्वनी लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले. तपास करीत असतानाच आणखी आठ गुन्हे उघड झाले. त्या गुन्ह्यांतील सोने व भ्रमणध्वनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये विविध कंपन्यांचे भ्रमणध्वनी, सोन्याची लगड यांचा समावेश आहे. जबरी चोरीच्या गुन्ह्यासह एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले.

हेही वाचा… त्र्यंबकेश्वर मंदिरप्रकरणी आता संजय राऊतांकडूनही चौकशीची मागणी; म्हणाले, “गोमूत्रधारी दंगलखोर…”

विशेषतः या सर्व गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोने-चांदी असा मुद्देमाल आणि भ्रमणध्वनी हस्तगत करण्यात आला. लोहमार्ग पोलीस अधिक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, कर्मचारी दिनेश पवार, हेमराज आंबेकर, संजय निकम आदींच्या पथकाने या कामी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lohmarg police has revealed nine crimes including theft in manmad nashik dvr