नाशिक : पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा ‘रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी अनिकेत साठे यांना बुधवारी नवी दिल्ली येथे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्यातील धरणांची स्थिती आणि त्यांचे निसर्गासह मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे वास्तववादी चित्रण मांडणाऱ्या त्यांच्या वृत्तमालिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धरणांच्या नव्या प्रकल्पांना पुरेसा निधी नसल्यामुळे मोठय़ा आणि मध्यम आकाराच्या २९६ जुन्या धरणांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले, याकडेही साठे यांच्या वृत्तमालिकेमुळे लक्ष वेधले गेले. या मालिकेसाठी अनिकेत यांची प्रादेशिक विभागाअंतर्गत ‘रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारा’साठी निवड झाली.

गाजलेली वृत्तमालिका

चिपळूणचे तिवरे धरण फुटल्यानंतर राज्यभरातील धरणांचा आढावा घेऊन त्याची स्थिती निदर्शनास आणणारी साठे यांची वृत्तमालिका २०१९ मध्ये ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाली होती. धरणांमध्ये बंद पडलेली हजारो उपकरणे, नदीपात्रातील अतिक्रमणामुळे शहरात निर्माण होणारी पूरस्थिती, खोरेनिहाय पाणी सोडताना समन्वयाचा अभाव, धरणांचे वेळच्या वेळी व्यवस्थापन न केल्यामुळे झालेली दुर्दशा आणि यामुळे धरण परिसरातील जनजीवनावर उमटणारे पडसाद यावर त्यांनी प्रकाश टाकला होता.

सरकारकडून दखल

‘लोकसत्ता’तील या बातम्यांची दखल घेत राज्य सरकारने या धरणांच्या व्यवस्थापन आणि दुरुस्तीसाठी १० टक्के निधीची तरतूद केली. तसेच बंद पडलेल्या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता.

दुसऱ्यांदा सन्मान

अनिकेत साठे हे ‘लोकसत्ता’च्या नाशिक विभागात कार्यरत असून त्यांना २०१४ सालीही ‘रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार’ मिळाला होता. संरक्षण दलामध्ये जुनी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांचा वापर, त्यामुळे होणारे अपघात याबाबत करण्यात आलेल्या वार्ताकनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. अनिकेत यांचा संरक्षणशास्त्र, शेती, धरणे आणि व्यवस्थापन या विषयांमध्ये अभ्यास आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta senior representative aniket sathe felicitated for series of news about situation of old dams asj