नाशिक: शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शेतकर्यांचे मार्गदर्शक आणि शेतकरी संघटनेच्या चळवळीतील “त्रिमूर्ती पैकी एक” अशी ओळख असलेले माधवराव खंडेराव मोरे ऊर्फ नाना (८८)  यांचे बुधवारी सायंकाळी पिंपळगाव बसवंत येथील निवासस्थानी निधन झाले. शेतकरी संघटनेच्या स्थापनेत शरद जोशी यांच्यासह पुढाकार घेणारा योध्दा शेतकरी नेता हरपल्याची भावना संघटनेशी संबंधित विविध नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : शिवशाहीला आग, चालकाच्या सतर्कतेने ४२ प्रवासी सुखरूप

आठ-दहा दिवसांपासून माधवरावांची प्रकृती अधिकच खालावली होती. माधवरावांनी १९८०-८१ मध्ये शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना केली होती. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा. कृषिमूल्य आयोग बरखास्त करावा, कांद्याला मंदी तर ऊसाला बंदी या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व असे आंदोलन केले होते. महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी एकवटू शकतात, हे या आंदोलनांनी दाखवून दिले. नाशिक जिल्हा हा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिला. शरद जोशी, माधवराव मोरे आणि प्रल्हाद तात्या कराड या शेतकरी संघटनेच्या त्रिमूर्तीने संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दणाणून सोडला होता. लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्र सरकारला त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. ऊस, कांदा या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रात जोशी आणि मोरे यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको, रास्ता रोको अशी आंदोलने करण्यात आली होती.

हेही वाचा >>> नाशिक: शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी मुंबई पोलिसांची मदत; ५० अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी झालेल्या लाठीमारात माधवराव मोरे यांना गंभीर दुखापत झाली होती. शेतकरी आंदोलनाची धार कमी न होता वाढतच गेल्याने तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी शरद जोशी, माधवराव मोरे, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे तत्कालीन अध्यक्ष माधवराव बोरस्ते यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. या आंदोलनांमुळे ऊसाला प्रथमच ३०० रुपये प्रति टन तर, कांद्याला १०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. प्रकृतीच्या कारणास्तव माधवराव १९८६ पासून शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून बाजूला झाले होते. दहा दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे वेगवेगळ्या शेतकरी संघटनांशी संबंधित नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतिची विचारपूस करण्यासाठी माधवरावांच्या निवासस्थानी येणे सुरु केले होते. माधवरावांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. माधवरावांवर गुरुवारी सकाळी १० वाजता पिंपळगांव बसवंत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhavrao more a senior leader of the farmers organization passed away ysh