मालेगाव : मालेगाव पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा मास्टर माईंडचे नाव निष्पन्न झाले आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागात तो वैद्यकीय अधिकारी असून डॉ. प्रतीक नवलखा असे त्याचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी रणनीती आखली परंतु ,त्याची भणक त्याला लागल्याने पोलीस पोहोचण्यापूर्वीच तो फरार झाला आहे. मालेगाव व मध्य प्रदेश पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे मोठे आव्हान आता निर्माण झाले आहे.
मालेगाव तालुका पोलिसांनी पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा म्हणजे १० लाखांच्या नकली नोटांसह दोघा परप्रांतीयांना पकडले. त्यानंतर नकली चलन रॅकेटची मोठी व्याप्ती असल्याचे तसेच मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये त्याचे नेटवर्क पसरल्याचे समोर आले. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांकडून आपल्या हस्तकांना निम्म्या किंमतीत या बनावट नोटा विक्री करण्यात येत होत्या व त्यानंतर हस्तक या नोटा चलनात आणत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रारंभी बऱ्हाणपूर येथील मौलाना महंम्मद जुबेर व नाझीर अक्रम अन्सारी या दोघांना नकली नोटांसह पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी या नोटा चलनात आणण्यासाठी ज्याच्याकडे दिल्या होत्या, त्या मालेगावमधील तौसिफ अंजुम अन्सारी याला अटक करण्यात आली. तौसिफ याने चांदवड येथील अमजद शहाबुद्दीन कोतवाल यालाही दीड लाखाचे नकली चलन दिल्याची माहिती पोलीस तपासात समजली. त्यानंतर पोलिसांनी पाचशे रुपयांच्या ५३ नकली नोटांसह अमजदला अटक केली. हे चारही जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.
मौलाना महंमद हा मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पैठिया गावामधील मशिदीमध्ये इमाम आहे. मालेगाव पोलिसांनी त्याला पकडल्यावर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याचे वास्तव्य असलेल्या मदरशामधील खोलीची झडती घेतली असता तेथे पाचशे रुपयांच्या १९ लाख ७८ लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. मौलाना जुबेर याने यापूर्वी दिपवाळी काळात मालेगावमधील तौसिफ यास सहा लाखाचे बनावट चलन दिले होते. त्यातील साडेतीन लाखाच्या नकली नोटा त्याने चलनात आणल्याची माहिती पुढे आली आहे. उर्वरित नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मौलाना व नाजीर हे आता देखील १० लाखांच्या बनावट नोटा त्यालाच देण्यासाठी मालेगावात आले होते. मात्र गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात तत्पूर्वीच ते अलगद अडकले.
मौलाना महंमद याला डॉ. प्रतीक नवलखा हा नकली नोटा देत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या मौलानाच्या मार्फत संपर्क साधून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला, परंतु मौलाना व त्याचा साथीदार पकडला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तो फरार झाला आहे. डॉ. प्रतीक नवलखा हा बऱ्हाणपूर येथील जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी असताना त्याच्या विरोधात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. नकली चलन रॅकेटमध्ये तो मास्टरमाईंड असल्याचे समोर आल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी बऱ्हाणपूर येथील त्याच्या मालमत्ता ‘सील’ केल्याचे सांगण्यात आले.
