मालेगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या मतदार याद्या वापरल्या जाणार आहेत, त्या सदोष असल्याने पारदर्शक निवडणुका होण्याबद्दल संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे पडताळणी करून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मागणीसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे बुधवारी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वारंवार लक्ष वेधल्यावरही मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्याच्या कामात कुचराई होत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली.

अनेक ठिकाणी मतदारांची दुबार व तिबार नावे नमूद असल्याचे दिसून येत आहे. रहिवास पत्ता नसलेले, अस्पष्ट छायाचित्र असलेले व नावात किरकोळ बदल असणाऱ्या एकाच व्यक्तीचे एकाच विधानसभा मतदार संघात एकापेक्षा अधिक वेळा नावे नोंदविण्यात आली आहेत. एकाच व्यक्तीची वेगळ्या विधानसभा मतदार संघात अधिक वेळा नावे असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

मयत मतदारांची नावे देखील वगळण्यात येत नाहीत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी संशय निर्माण झाला आहे. किंबहूना निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून लोकशाहीसाठी ही बाब अत्यंत घातक असल्याचे समितीने म्हटले आहे.

दरवर्षी मतदान नोंदणी मोहीम राबवली जाते. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) त्याची जबाबदारी असते. मात्र नोंदणी केलेल्या मतदारांची पडताळणी अनेकदा या अधिकाऱ्यांकडून नीट होत नाही. त्यात निष्काळजीपणा दाखवला जातो. तसेच विशिष्ट राजकीय पक्षांना लाभ पोहोचण्यासाठी देखील काही अधिकाऱ्यांकडून हातभार लावला जातो.

त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगावर संशय निर्माण होत असल्याने यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समितीने केली. तसेच एकाच व्यक्तीने अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवणे हा देखील गुन्हा आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक ठिकाणची नावे स्वतःहून कमी न करणाऱ्या लोकांवर देखील कारवाई करावी, असा आग्रह समितीने धरला.

देशात प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळालेले आहे. मतदार याद्यांमधील घोळ संपविण्यासाठी व मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी आधार कार्डचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे आधार कार्ड मतदार यादीशी संलग्न केले आणि मतदान प्रक्रिया राबवित असताना बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला तर बोगस मतदानाला आळा बसेल तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होईल असा दावा समितीने केला आहे. अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी आंदोलनस्थळी येऊन समितीचे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात समितीचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. के.एन अहिरे, निखिल पवार, गुलाब पगारे, विवेक वारुळे, मदन गायकवाड, दीपक भोसले, सुरेश गवळी, अशोक पठाडे, दीपक पाटील,भरत पाटील,शेखर पगार,‌अनिल पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पवन ठाकरे,जितेंद्र देसले, युवराज गोलाईत, दिनेश पाटील,कैलास तिसगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) संदीप पवार,दिनेश ठाकरे रिपाईचे भरत म्हसदे,बहुजन समाज पक्षाचे आनंद आढाव,काँग्रेसचे शरद खैरनार आदी सामील झाले होते.