मालेगाव : मालेगाव येथील सराफी व्यावसायिकाकडून बँकेत भरणा करण्यासाठी नेहमीप्रमाणे रोकड नेण्यात येत होती. ही रक्कम लुटून नेण्याचा कट काही दरोडेखोरांनी आखला. परंतु स्थानिक नागरिकांनी दाखवलेली जागरुकता व पोलिसांनी लागलीच घटनास्थळी घेतलेली धाव यामुळे दरोडेखोरांची योजना अयशस्वी ठरली. दरोडेखोरांच्या या टोळीतील चार जणांच्या मुसक्या आवळण्यास पोलीस यंत्रणेला यश आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकाच्या रोकडवर दरोडा टाकण्याच्या या कटात संबंधित बँकेचा कॅशियरच सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

शहराच्या मोसम पुलावरील प्रसिद्ध दुसाने ज्वेलर्सचे संचालक गोविंद नामदेव दुसाने हे ५० लाखांची रोकड पिशवीत घेऊन सटाणा नाक्यावरील एचडीएफसी बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. त्यावेळी दुसाने यांचे दुकान ते बँकेच्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणारे काही लोक घुटमळत असल्याचे तेथील व्यावसायिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात तातडीने छावणी पोलिसांना अवगत केले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोघा संशयीतांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक जण पोलिसांना धक्का देऊन तेथून पळून गेला. ताब्यात घेण्यात आलेल्या एकाकडे विचारपूस केली असता दरोड्याचा हा कट उघडकीस आला. त्यानंतर आणखी तिघांना लागलीच अटक करण्यात पोलिसांना यश आले.

दुसाने यांच्या ताब्यातील रोकड असलेली पिशवी दिवसाढवळ्या व अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावरून लुटून नेण्याचा प्रयत्न या टोळीचा होता. याप्रकरणी सिद्धार्थ सतीश महाडिक (सातारा), सौरभ राजेंद्र निकम (सातारा), रोशनकुमार सावळीराम अहिरे (मालेगाव), प्रशांत अशोक जाधव (सोयगाव मालेगाव), दिलीप मंगा सूर्यवंशी (टेहरे मालेगाव) व अरुण नामक आणखी एक अशा सहा संशयीतांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सिद्धार्थ, रोशनकुमार, प्रशांत व दिलीप या चौघांना अटक करण्यात आली आहे.

फरार झालेले अन्य दोघे सातारा जिल्ह्यातील असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या संशयीतांपैकी एक असलेला दिलीप सूर्यवंशी हा याच बँकेत कॅशियर म्हणून कामास आहे. बँक ग्राहकाच्या भरण्याच्या रकमेवर दरोडा टाकण्याच्या कटात चक्क बँकेच्या कर्मचाऱ्याचाच सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सराफ व्यावसायिक दुसाने हे दुपारच्या वेळी दररोज येथील सटाणा नाक्यावरील एचडीएफसी बँकेत ४० ते ५० लाखाचा भरणा करण्यासाठी जात असतात. यावर पाळत ठेवून भरण्याची ही रक्कम लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न होता. मात्र आजूबाजूच्या व्यावसायिकांनी दाखवलेली जागरुकता व वेळीच घटनास्थळी दाखल झालेले पोलीस यामुळे हा प्रयत्न फसला आणि संशयीतांना गजाआड व्हावे लागले. पोलिसांनी संशयीतांच्या ताब्यातून मिरची पावडर,काळ्या रंगाचे मास्क, काळे जॅकेट, काळे ग्लोज,दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू,सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव, हवालदार विश्वास बागडे, शरद भुसनर, शांतीलाल जगताप, कैलास चोथमल, नितीन अहिरे, सलमान खाटीक यांनी दरोड्याचा हा कट उघडकीस आणण्याची कारवाई केली आहे. अधिक तपास निरीक्षक दीपक जाधव हे करीत आहेत.