नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींची संख्या अखेरच्या दिवसापर्यंत ३८४७ वर पोहोचली. अंतिम मतदार यादी ९ जुलै रोजी प्रसिध्द करावयाची आहे. हजारोंच्या संख्येने प्राप्त हरकतींची स्थळ पाहणी, पडताळणी आणि सुनावणीला अतिशय कमी कालावधी राहिल्याने महापालिकेने ४०० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कामाला जुंपला आहे. संबंधितांकडून काम नि:पक्षपातीपणे होते की नाही, याची खात्री करण्यासाठी खुद्द पालिका आयुक्त रमेश पवार  मैदानात उतरले. त्यांनी थेट प्रभागात जाऊन कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनपा निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या मतदारयादीतील गोंधळ अगदी पहिल्या दिवसापासून उघड होत होता. याच कारणास्तव संकेतस्थळावर ती उशिराने झळकली. विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी प्रभागनिहाय विभाजित करताना घोळ झाल्याचे सांगितले जाते. प्रभागांची नावे त्या त्या प्रभागातील चतु:सीमेप्रमाणे येणे गरजेचे होते. काही प्रभागात विशिष्ट भागातील मतदारांची नावे थेट दुसऱ्या प्रभागात गेली. जिवंत मतदारांची नावे सापडत नसताना मयत मतदारांची नावे यादीत असल्याचे उघड झाले. सदोष यादीवर शिवसेना, मनसे, आपने आक्षेप नोंदविले. भाजपने तर अधिकाऱ्यांनी दबावाला बळी पडून जाणीवपूर्वक याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला. मतदार याद्यांमधील नाव आणि पत्त्याबाबत हरकत नोंदविण्याची मुदत रविवारी संपुष्टात आली. या काळात प्राप्त झालेल्या तब्बल चार हजार हरकतींनी याद्यांमधील सावळय़ागोंधळावर शिक्कामोर्तब केले.

प्राप्त हरकती आणि सूचना लक्षात घेऊन प्रभागनिहाय तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करून युध्दपातळीवर काम हाती घेण्यात आले. यात सुमारे ४०० कर्मचारी सहभागी असून त्यांच्या सुट्टय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत प्रत्यक्ष स्थळ पाहणीद्वारे पडताळणी, सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांच्या कामाची पडताळणी

मतदार यादी कर्मचाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये, याकरिता आयुक्त रमेश पवार यांनी थेट प्रभागात जाऊन कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी केली. पंचवटीतील काही प्रभागांमध्ये भेटी दिल्या. तसेच रामनाथनगर, चामर लेण्याच्या पायथ्याशी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी करून खात्री केली. हरकती आणि सूचनांवर योग्य पध्दतीने कामकाज होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिडकोत सर्वाधिक हरकती

मतदारयाद्यांबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याच्या मुदतीत सिडकोत सर्वाधिक २४३३ तर, नाशिक पश्चिम विभागात सर्वात कमी ४६ हरकती दाखल झाल्या. नाशिक पूर्वमध्ये २४४, पंचवटीत ३९६, नाशिकरोड विभागात २२२ आणि सातपूर विभागात १५५ अशा एकूण ३४९६ आणि ट्रॅू व्होटर अ‍ॅपद्वारे ३५१ अशा एकूण ३८४७ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mind exercise objections voter list employees field ysh
First published on: 05-07-2022 at 00:02 IST