नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत आधीच बिघाडी झाली असताना आता प्रचारातही गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पालकमंत्री दादा भुसे यांनी आयोजित बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिक कोकाटे आणि सरोज अहिरे हे दोन आमदार सहभागी झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. शिंदे गटाच्या बैठकीस उपस्थितीमुळे दोन्ही आमदारांची अडचण झाली असून निवडणूक प्रचारार्थ ही बैठक असल्याची पूर्वकल्पना नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांचा निरोप असल्याने आम्ही तिथे गेल्याचा दावा दोन्ही आमदारांकडून करण्यात आला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) महेंद्र भावसार यांना तर, शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किशोर दराडे यांना मैदानात उतरविले आहे. शिंदे गटाला राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारासह भाजप बंडखोराविरुद्धही तोंड द्यावे लागत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे यांच्यासमोर नामसाधर्म्य असणाऱ्यांचे आव्हान आहे. या गोंधळात अजित पवार गटाच्या दोन आमदारांनी शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत सहभागी होऊन आणखी भर घातली. शिवसेना उमेदवारासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीस अजित पवार गटाच्या आमदारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अधिकृत उमेदवार मैदानात असल्याने मंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेच्या बैठकीला गेले नाहीत. परंतु, त्यांच्या पक्षाचे माणिक कोकाटे आणि सरोज अहिरे हे दोन आमदार त्या बैठकीत सहभागी झाले. दिशाभूल करून संबंधितांना बैठकीला बोलावण्यात आल्याचा सूर राष्ट्रवादीच्या गोटात उमटत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा निरोप आला म्हणून आपण बैठकीला गेल्याचे कोकाटे यांनी मान्य केले. आमच्या पक्षाने कुणाला उमेदवारी दिली आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. परंतु, याबाबतची स्पष्टता झाल्यामुळे आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री भुसे यांनी बैठकीसाठी बोलाविल्याने आपण गेलो होतो. पक्षाने उमेदवार दिल्याचे सांगितले असते तर आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत गेलो नसतो, असे आमदार अहिरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठकीत सहभागी करीत शिंदे गटाने राजकीय पातळीवर गोंधळ उडवून दिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – नाशिक: पंचवटीत रिक्षाचालकाची हत्या

हेही वाचा – नाशिक: पोत्यामध्ये प्लास्टिकच्या कवट्या, संशयित ताब्यात

कुणाची दिशाभूल करून आम्हाला काय साध्य करायचे आहे. संबंधित राष्ट्रवादीचे आमदार बैठकीत काहीवेळ बोललेही. मुळात या मतदारसंघातील मतदार हा पाच जिल्ह्यांत विखुरलेला शिक्षक आहे. सामान्य जनता मतदार नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मतदार याद्याही बैठकीत वितरित करण्यात आल्या. – दादा भुसे (पालकमंत्री तथा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते, नाशिक)