मराठी नववर्षांचे स्वागत उत्साहात करण्याची जय्यत तयारी सुरू असून नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने शुक्रवारी शहरातील विविध भागांतून स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेंतर्गत दोन वर्षांपूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती अभियान राबविले होते. यंदाच्या सोहळ्यावर महापालिका निवडणुकीचे सावट राहणार असल्याने जनसंपर्कासाठी इच्छुकांची मांदियाळी यात्रांमध्ये पाहावयास मिळू शकते. संयोजक समितीने यंदा ‘स्वच्छता अभियाना’चा संदेश देण्याचे निश्चित केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढी पाडवा अन् नववर्ष स्वागतयात्रा हे समीकरण आता उत्तर महाराष्ट्रात रूढ होऊ लागले आहे. नाशिकमध्ये तर या दिवसाचा बाज काही वेगळाच असतो. या दिवशी काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांची तयारी कित्येक दिवसांपासून सुरू आहे. विविध भागांत अतिशय कल्पकतेने यात्रेचे नियोजन केले जाते. काही भागात यानिमित्त गायकांच्या मैफलीचे प्रयोजन आहे. विविध भागांतून भल्या सकाळी नववर्ष स्वागतयात्रांना सुरुवात होईल. नववर्ष स्वागत समितीच्या ‘नववर्ष स्वागत’ या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष आहे. शहरातील गंगापूर रोड येथील तीन ठिकाणे, त्र्यंबक रोड, लव्हाटे मळा, महात्मानगर, निर्मलनगर, कॉलेज रोड परिसरातून यात्रा काढण्यात येणार आहे.

त्यात गंगापूर रोडची यात्रा मारुती मंदिर नरसिंहनगर, राम मंदिर पंपिंग स्टेशन आणि ठाकरे बंगला येथून निघणार आहे. सभोवतालच्या परिसरात भ्रमंती करत त्या बीवायके महाविद्यालय येथे येतील. त्र्यंबक रोडवरील यात्रा राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, लव्हाटे मळ्यातील महालक्ष्मी मंदिर, महात्मानगर बस थांबा, निर्मलनगर, काळेनगर येथून कॉलेज रोडवर तिचा समारोप होईल. यात्रेत सायकल, मोटार सायकल यांचा समावेश राहणार आहे. याच पद्धतीने नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने इंदिरानगर, सदिच्छानगर, राजीवनगर परिसर, चेतनानगर आणि सिडको या ठिकाणाहून वेगवेगळ्या नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येतात. दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, मतदाराला लोकशाही, मतदान प्रक्रिया यांचे महत्त्व कळावे यासाठी मतदार जागृती अभियान राबविले होते. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे यंदा या निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी यात्रांमध्ये पाहावयास मिळण्याची अधिक शक्यता आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal election may affect on new year celebration rally in nashik