मालेगाव : तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील पाटणे फाट्याजवळ राज्य परिवहनची बस आणि मालमोटार यांच्यात समोरासमोर धडक होऊन बस चालकासह नऊ प्रवासी जखमी झाले. पिंपळगाव बसवंत आगाराची बस नाशिकहून मालेगावकडे येत असताना दुपारी हा अपघात घडला. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने निघालेली मालमोटार रस्ता ओलांडत असताना बसवर जाऊन धडकली. या अपघातात चालकाकडील पुढील भाग दाबला गेल्याने बसचे मोठे नुकसान झाले.
अपघातात चालकासह नऊ प्रवासी जखमी झाले. त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव आगाराच्या प्रमुख मनीषा देवरे यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.