नाशिक – महानगरपालिकेने बी. डी. भालेकर शाळेची इमारत पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याच्या हालचाली सुरु केल्याने माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असतांना आता लोकप्रतिनिधीही या निर्णयाला विरोध दर्शवित आहेत. खा. राजाभाऊ वाजे यांनी मनपाला हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
खासदार वाजे यांनी महानगरपालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात भूमिका मांडली आहे. बी. डी. भालेकर शाळा ही नाशिकमधील अनेक पिढ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेली एक ऐतिहासिक व शैक्षणिक परंपरेची ओळख आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील हजारो विद्यार्थ्यांनी या शाळेतून शिक्षण घेऊन समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अशा शाळेची इमारत पाडून तेथे विश्रामगृह उभारणे म्हणजे शहराच्या शैक्षणिक वारशावर अन्याय करणारे पाऊल आहे.
शाळा काही कारणांमुळे बंद करण्यात आली असली तरी तिचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अमूल्य आहे. अशा ठिकाणी विश्रामगृह उभारणे हे जनतेच्या भावनांना धक्का देणारे आहे. त्या जागेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक उपक्रमांसाठी किंवा सामाजिक उपयोगाच्या प्रकल्पासाठी करावा, हेच जनतेच्या हिताचे ठरेल. बी.डी. भालेकर शाळेच्या इमारतीच्या जागेचा वापर विश्रामगृहासाठी न करता ती शैक्षणिक उद्देशासाठी राखून ठेवावी. तसेच, स्थानिक जनतेच्या मतांचा आदर करून कोणताही विकास प्रकल्प राबवावा, अशी मागणी वाजे यांनी केली आहे.
दरम्यान, मनपा प्रशासनाकडून या विषयावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडूनही शाळेच्या इमारतीच्या संवर्धनाची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेत या निर्णयाला विरोध केला आहे.
गंजमाळ, शालिमार, जुने नाशिक, दूधबाजार, सारडा सर्कल आदी परिसरातील अत्यल्प उत्पन्न घटकांतील विद्यार्थ्यांसाठी बी. डी. भालेकर शाळा दीपस्तंभ आहे. शाळा फक्त संरक्षितच करू नये तर ती पुनर्जीवित करावी. – खा. राजाभाऊ वाजे.
प्रशासनाच्या अनास्थेची शिकार
मोठी विद्यार्थी संख्या असूनही या शाळेतील शिक्षण आणि इतर सुविधांकडे योग्य लक्ष न दिल्याने शाळेची पटसंख्या घटत गेली. एका बाजूला शाळेच्या आजूबाजूला मोठा अशिक्षित घटक आणि दुसरीकडे शाळेतील पटसंख्या घटणे परस्परविरोधी चित्र होते. याला कारण प्रशासनाची अनास्था असल्याची चर्चा आहे.
