नाशिक – गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात अडकल्यानंतर अतिशय तत्परतेने शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) भाजपमध्ये प्रवेश करणारा मामा राजवाडे आणि टोळीच्या कारवाया उघड होऊ लागल्या आहेत. नाशिकमधील विसे मळा गोळीबार प्रकरणात राजवाडेला आधीच अटक झाली आहे. पंचवटीतील एका हॉटेल मालकाकडे फुकट मद्य आणि खंडणी मागितल्या प्रकरणी मामा राजवाडेसह त्याच्या टोळीवर नवीन गुन्हा दाखल झाला आहे. यातील पाच संशयितांना रविवारी पोलिसांनी अटक केली.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या राजकीय गुन्हेगारांविरोधात नाशिक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई करा, असे आदेश दिल्यानंतर या कारवाईला चांगलाच वेग आला. अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील बागूल आणि त्यांचे कट्टर समर्थक मामा राजवाडे यांनी भाजपमध्ये शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश केला होता. विसे मळा गोळीबार प्रकरणात बागूल यांच्या पुतण्यासह राजवाडे यांना अटक केली. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आता राजवाडे आणि त्याच्या टोळीविरुद्ध खंडणीचा नवीन गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

मामा राजवाडेसह १० ते १२ साथीदारांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये मालेगाव स्टँड येथील न्यू पंजाब रेस्टॉरंट ॲण्ड बार या हॉटलमध्ये येऊन मालकाकडे ५० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. पैसे देण्यास मालकाने नकार दिल्यावर संशयितांनी हॉटेलची तोडफोड करण्याची धमकी दिली होती. त्याच दिवशी रात्री राजवाडे टोळीतील तीन ते चार जण हॉटेलमध्ये आले. फुकट मद्याची मागणी केली. त्यास नकार दिल्यावर संशयितांनी हॉटेल बंद करण्याची धमकी देत एकाने महिलेचा विनयभंग केला. पुन्हा काही दिवसांनी राजवाडे टोळीच्या सदस्यांनी गोंधळ घातला. हॉटेल व्यवस्थापक राहुल नंदनला राजवाडेने स्वत:च्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याच्या साथीदारांनी नंदनला धमकावत बेदम मारहाण केली.

मामा राजवाडे आणि त्याच्या साथीदारांची परिसरात दहशत असल्याने भीतीपोटी आजपर्यंत आपण तक्रार केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अलीकडेच राजवाडेसह त्याच्या साथीदारांवर कारवाई झाल्यामुळे आपणास धीर आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या प्रकरणी मामा राजवाडेसह १२ जणांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रवीण कुमावत (क्रांतीनगर), बाबासाहेब बढे (तळेनगर, पंचवटी), राहुल जैन (हरिओम सोसायटी, इंदिरानगर), प्रकाश गवळी (पांडुरंग निवास, मालेगाव स्टँड), योगेश पवार (साई अपार्टमेंट, शांतीनगर) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांंची २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गोळीबार प्रकरणानंतर पोलीस कोठडीत असणाऱ्या मामा राजवाडेचे कारनामे बाहेर येत आहे.