नाशिक – शहर परिसरातील सोनसाखळी, भ्रमणध्वनी, वाहन चोरी, जबरी चोरी यांसह अन्य गुन्ह्यांमध्ये गुन्हे शाखा एक आणि दोनने परत मिळविलेला तीन कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल तक्रारदारांना पोलिसांकडून परत करण्यात आला.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा एक आणि दोनच्या वतीने काही गुन्हे उघडकीस आले. त्याअंतर्गत आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वेगवेगळ्या कारवाईत ३५,७१,९९७ रुपयांचे दागिने, १५ लाख ९५ हजार रुपयांच्या दुचाकी, ५८ लाख पाच हजार रुपयांच्या चारचाकी, तीन लाख ६७ हजार ५०० रुपयांचे भ्रमणध्वनी तसेच दोन कोटी ५३ लाख ३१ हजार २०० रुपये परत मिळविण्यात आले. शुक्रवारी पोलीस आयुक्तालय परिसरात तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आला.

हेही वाचा : मौजमजेसाठी चोरी! अल्‍पवयीन मुलांकडून अकरा दुचाकी जप्‍त

दर्शना आढाव, स्नेहल येलमल्ले, मंगेश काजे, सुनील यादव, नितीन गवांदे, बापू सूर्यवंशी आदी तक्रारदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आतापर्यंत आठ वेळा मुद्देमाल परत करण्यात आला असून हा आकडा नऊ कोटी १४ लाख एक हजार ३९९ रुपयांपर्यंत गेला आहे.