नाशिक : जिल्ह्यातील अपंगांच्या सर्व विशेष शाळा, कार्यशाळेचे वेळापत्रक एकसमान होण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने नवे वेळापत्रक पाठविण्यात आले आहे. परंतु, संबंधित शाळांनी यावर आक्षेप घेतल्याने या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदातंर्गत असलेल्या सर्व शाळांचे वेळापत्रक एकसमान असते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील अपंगांच्या शाळांचे वेळापत्रक एकसमान नाही. अपंगांच्या शाळांचेही वेळापत्रक एकसमान असल्यास कामकाजासाठी सुलभता येईल, शालेय वेळापत्रकात एकसुत्रीपणा यावा तसेच शाळेला देण्यात येणाऱ्या सुट्यांविषयी एकसमान नियमन व्हावे, यासाठी विशेष शाळा संहिता २०१८च्या प्रकरण तीनमधील शालेय विभाग अंतर्गत शाळेची सत्रे ठरविण्यात आली.
यामध्ये शालेय वर्ष दोन सत्रांमध्ये विभागले जाईल. पहिले सत्र जून ते ऑक्टोबर आणि दुसरे सत्र नोव्हेंबर ते एप्रिल असे राहील. सामान्यत: दिवाळीसाठी योग्य होईल, अशा पध्दतीने ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुट्टी राहील. शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्यक्ष शाळेच्या कामाचे दिवस २५० हून कमी असणार नाहीत. शालेय विभागाने संमत केलेल्या नियमांप्रमाणे शहरी भागाकरता महानगरपालिका , नगरपालिकेने जाहीर केलेल्या आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने सामान्य शाळासाठी जाहीर केलेल्या सुट्या राहतील. शाळांमध्ये सर्वसाधारणपणे सहा तास प्रत्यक्ष शिकविण्याचे कामकाज केले जाईल, कर्मचारी किमान आठ तास शाळांमध्ये उपस्थित राहून काम करतील, उन्हाळ्यात शाळेचे तास सकाळी आणि सहा तासांपेक्षा कमी ठेवता येतील. विद्यार्थ्यांच्या शिकवण्याची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी पाच राहील. यांसह इतर काही सूचना करण्यात आल्या. या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार होती. परंतु, जिल्ह्यातील अपंगांसाठी असलेल्या शाळांनी या नवीन वेळापत्रकाच्या अंमलबजावणीस विरोध केला.
याविषयी संबंधित शाळांमधील शिक्षिकांनी भूमिका मांडली. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या वेळापत्रकाविषयी संबंधित शाळांशी कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. थेट नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी अपेक्षित होती. या वेळापत्रकाला शाळास्तरावर आक्षेप घेण्यात आला आहे. अपंगांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी यावर आक्षेप घेतला. वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करा, विद्यार्थ्यांच्या, शाळेच्या समस्या समजुन घ्या त्यानंतर अंमलबजावणी करा, अशी भूमिका घेण्यात आल्याने वेळापत्रकावर स्थगिती आली असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
