Gold Rate : जळगाव : धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जात असले तरी सध्याची उच्चांकी दरवाढ लक्षात घेता यंदा किती ग्राहक दोन्ही धातुंची उत्साहाने खरेदी करतात, हा एक प्रश्न आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीला स्वस्त दराने सोने, चांदी खरेदी करणारे ग्राहक आता लखपती झाले आहेत. त्यांना दोन्ही धातुंच्या गुंतवणुकीतून मोठा नफा वर्षभरात मिळाला आहे.

भारतीय संस्कृतीत सण-उत्सव, विशेषतः दिवाळीच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने हे समृद्धी, स्थैर्याचे प्रतीक देखील मानतात. मात्र, अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे दोन्ही धातू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. २४ कॅरेट सोने हे सर्वाधिक शुद्ध आणि गुंतवणुकीसाठी उत्तम मानले जाते. परंतु, त्यापासून दागिने बनविले जात नाहीत. दागिने प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्यापासून तयार केले जातात, तर काही हलक्या आणि आधुनिक डिझाइन्ससाठी १८ कॅरेट सोन्याचा वापर होतो. मात्र, या दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असल्याने अनेकांना दागिने खरेदी करणे अवघड होत चालले आहे.

सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वेगाने वाढत आहेत. दिवाळी आणि त्यानंतर येणाऱ्या लग्नसराईचा काळ लक्षात घेता ते लवकरच प्रति तोळा दीड लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायातील जाणकार व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, चांदी सुद्धा दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे आणि लवकरच अडीच लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, उच्चांकी दरवाढीनंतर धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करून शुभ मुहूर्त साधायचा की खिसा वाचवायचा, याचा विचार ग्राहकांवर करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोने, चांदीचे दर दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. त्यामुळे त्यात पुढील काळात आणखी किती वाढ होते, एवढेच पाहणे आता ग्राहकांच्या आणि व्यावसायिकांच्या हाती राहिले आहे.

गेल्या वर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबरला होती. त्या दिवशी जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम ८१ हजार ९८८ रूपयांपर्यंत होता. त्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधीच सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३१ हजार ३२५ रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ६० टक्क्यांनी दरवाढ झाल्याने त्यावेळी सोन्यात ५० हजार रूपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना सुमारे ३० हजार रूपये तसेच एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना सुमारे ६० हजार रूपयांचा नफा झाला आहे. किरकोळ स्वरूपात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही थोडाफार नफा मिळालाच आहे.

सोने, चांदी गुंतवणुकीत किती नफा ?

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळालेल्या नफ्याच्या तुलनेत चांदीत गुंतवणूक करणारे ग्राहक जास्त नशीबवान ठरले आहेत. कारण, गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीला जळगावमध्ये चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख एक हजार ९७० रूपयांपर्यंत होते. त्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या दोन दिवस आधीच चांदीने एक लाख ९० हजार ५५० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला आहे. वर्षभरात तब्बल ८७ टक्क्यांनी दरवाढ नोंदवली गेल्याने चांदीत त्यावेळी ५० हजाराची गुंतवणूक करणाऱ्यांना ४० हजारांपेक्षा अधिक आणि एक लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांना ८५ हजारांपेक्षा अधिक नफा झाला आहे.