नाशिक : रक्षाबंधनचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि राज्यातील सर्व महिला पेन्शनधारक जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एकवटल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोघा उपमुख्यमंत्र्यांना २८ ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत राख्या पाठविण्यात येत असून “नको ओवाळणी,नको खाऊ.. जुनीच पेन्शन हवी भाऊ….!” अशी साद त्यांना घालण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा हा अनोखा उपक्रम आहे. राखी पाकिटावर “नको ओवाळणी,नको खाऊ.. जुनीच पेन्शन हवी भाऊ….!” असा संदेश लिहिण्यात येत आहे. नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त, राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली असून डीसीपीएस योजना आणण्यात आली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या स्वरुपातील आंदोलनांच्या माध्यमातून लढा देत आहेत. परंतु, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे लढ्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे साकडे राज्यातील महिला निवृत्ती वेतनधारक करीत आहेत. यंदा रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून जुनी पेन्शनच हवी, असा हट्ट महिला कर्मचारी सत्ताधाऱ्यांकडे करणार आहेत.

हेही वाचा : धुळ्यात भाजप खासदारांच्या निवासस्थानासमोरच खड्डे; रस्ता दुरुस्तीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन

रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळाची काठी म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, हीच खरी आमच्यासाठी ओवाळणी ठरेल, असे राज्यातील महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या उपक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या दीपिका एरंडे यांनी मांडली असता संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर तसेच राज्य पदाधिकारी गोविंद उगले, आशुतोष चौधरी, संजय सोनार यांनी उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.

हेही वाचा : शासन आपल्या दारीऐवजी पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा, आमदार खडसेंचा सरकारला सल्ला

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील आपल्या लहानग्या कर्मचारी भगिनींना खाली हात पाठविणार नाहीत. पेन्शन कर्मचाऱ्यांचा संवैधानिक अधिकार व म्हातारपणाची काठी आहे. तो अधिकार शिंदे हे पुन्हा मिळवून देतील अशी आशा आहे.’, असे शितल खैरनार ( जि.प शाळा, चंदनपुरी,मालेगाव) यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : नाशिक: जनावरांचे बाजार, बैल शर्यतीवर बंदी; लम्पी नियंत्रणासाठी जिल्हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून रक्षाबंधननिमित्त राज्यातील विविध विभागातील एनपीएस धारक महिला कर्मचारी राख्या पाठवित आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित होण्यासाठी जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री देतील, अशी लाखो बहिणींची आशा आहे.’, असे मनीषा मडावी (राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना) यांनी म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik government women employees sending rakhi to cm eknath shinde for old pension scheme on rakshabandhan 2023 css