नाशिक – कुंभमेळ्यासाठी दिल्या जाणाऱ्या हजारो कोटींच्या कामांवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि स्थानिक कंत्राटदारांच्या संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे. यावरून गदारोळ उडाला असताना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणने विकास कामांच्या निधी वितरणासाठी वित्तीय कार्यप्रणाली निश्चित केली आहे. यामुळे वेळ आणि गुणवत्ता कायम ठेवण्यास मदत होईल. तसेच, या संपूर्ण कामांमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याची छोटी, छोटी कामे एकत्रित करून ती विशिष्ठ ठेकेदारांना देण्यासाठी महापालिकेसह अन्य विभागांकडून प्रयत्न होत असल्याचा आक्षेप शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आधीच नोंदवला आहे. तर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची नाशिक शाखा आणि ठेकेदारांच्या संघटनांनी स्थानिक कंत्राटदारांना डावलून कुंभमेळ्याची कामे गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत सहा हजार कोटींच्या कामांना मान्यता दिली गेली आहे. विकास कामांच्या प्रत्येक टप्प्यावर निधी वितरणासाठी प्राधिकरणने वित्तीय कार्यप्रणाली निश्चित केली आहे. कामाची सद्य:स्थिती आणि कुंभमेळ्यासाठीचे त्याचे महत्व लक्षात घेऊनच या निधीचे वितरण केले जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

प्राधिकरणाकडे निधी उपलब्ध असतांना तो काही प्रमाणात कामाच्या खर्चापेक्षा अधिक संबंधित यंत्रणेकडे राहील, अशी व्यवस्था या कार्यप्रणालीमुळे शक्य होईल. यामुळे कंत्राटदारांची देयकेही वेळेवर निर्गमित करण्यास मदत होईल. मात्र गुणवत्ता आणि इतर बाबीमध्ये कमतरता आढळल्यास, त्याची पूर्तता झाल्यावरच निधी वितरित करण्यात येईल, असे सूचित केले आहे.

कामांना कार्यारंभ आदेशानंतर त्या त्या प्रमाणात, मात्र एका टप्प्यात कामाच्या एकूण रकमेच्या अधिकतम २० टक्के इतका निधी वितरीत करण्यात येईल. त्यासाठी या यंत्रणांनी निधीची मागणी करणे आवश्यक आहे. या रकमेतील १५ टक्के निधी कामाच्या भौतिक प्रगतीनुसार दिल्यानंतर पुढील २० टक्के रक्कमेची मागणी प्राधिकरणाकडे करावी लागेल. हीच पद्धत पुढील २० टक्के निधी मागणीसाठी अवलंबावी लागणार आहे. वित्तीय कार्यप्रणालीतील निर्देशांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

विनाकारण कामे रखडणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणांना घ्यावी लागणार आहे. कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि वेग तपासणी, तसेच अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत वेळोवेळी तपासणी व मूल्यांकन करण्यात येईल. यासाठीचा खर्च हा कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेतून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत थेट संबंधित यंत्रणांना दिला जाणार आहे.