नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी शनिवारी सायंकाळी रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा अशा विविध स्थळांसह आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उभारलेल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षास भेट देऊन पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरात सीसी टीव्हींचे व्यापक जाळे उभारण्यात येत आहे. गर्दी नियंत्रण व कुठलीही परिस्थिती हाताळण्यात सीसी टीव्हींची महत्वाची भूमिका असणार आहे. मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या आढाव्याप्रसंगी या प्रणालीतील त्रुटी समोर आल्या. यावर त्यांनी नाराजी प्रगट केली.
२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिशय कमी कालावधी राहिल्याने प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार कोटींच्या विकास कामांचे आराखडे सादर झाले असून आठ ते १० हजार कोटींच्या कामांना शासनाने मान्यता देत निधीही उपलब्ध केला आहे. पावसामुळे रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्थानिक पातळीवर कुंभमेळ्याच्या चाललेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेशकुमार शनिवारी शहरात आले होते. दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर सायंकाळी त्यांनी द्वारका परिसर, अमृत स्नान पर्वणी मार्ग, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुंफा, सीसी टीव्ही नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी रामकाल पथ, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष आदींसह कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
कुंभमेळ्यासाठी चार हजार शक्तीशाली कॅमेऱ्यांची श्रृंखला उभारली जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत यापूर्वीच सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षास भेट देऊन मुख्य सचिव राजेश कुमार यांनी माहिती घेतली. पडद्यावरील नकाशावर कुठलेही ठिकाण निवडले तर, सीसी टीव्ही कॅमेऱ्यातून थेट तेथील परिस्थिती लगेच पाहता येते. हे समजल्यानंतर त्यांनी काळाराम मंदिर परिसरातील स्थिती दाखविण्यास सांगितले. परंतु, ऐनवेळी तेथील सीसी टीव्ही कनेक्ट झाला नाही. अन्य दोन स्थळांबाबतच्या सीसी टीव्हींबाबतही तेच घडले. तेथील सीसी टीव्ही कनेक्ट न झाल्यामुळे पडद्यावर प्रत्यक्ष प्रक्षेपण बघता आले नाही. कॅमेरे व उपकरणे बसवले. परंतु, ते कनेक्ट झाले नसल्याची नाराजी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रयागराज येथील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित एक चित्रफित त्यांना भ्रमणध्वनी दाखवली.
