नाशिक – देशभरातील भाविकांसाठी पवित्र अशा कुंभनगरी नाशिकला झालंय तरी काय ? कोणीही उठतो, हातात कोयता, चाकू, कोयता घेतो. रस्त्यात, चौकात साथीदारांसह एखाद्याची मुद्दामहून कळ काढली जाते. पैशांची मागणी केली जाते. विरोध झाल्यास हल्ला केला जातो. एखाद्या दुकानात शिरुन हप्ता मागितला जातो. प्रतिकार केल्यास भोसकले जाते. अबड, सातपूर या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना अडवून लुटमार केली जाते. जोडीला टोळ्यांमधील आपआपसातील वादातून हाणामाऱ्या आहेतच. महाराष्ट्राचे गृह खाते असलेल्या मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचे नाशिक शहरात तीन आमदार आहेत. त्यामुळे किमान नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत नाशिककरांना तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या कार्यकालाची आणि कार्यशैलीची आठवण येत आहे.
शहरात एक ते दोन वर्षांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. सध्या तर गुन्हेगारांना पूर्णपणे मोकळे रान असल्स्प्रमाणे त्यांच्याकडून हैदोस घातला जात आहे. बिनदिक्कतपणे गुंडांच्या टोळ्या कोयते, तलवारी, चाकू नाचवत फिरत आहेत. हत्या करीत आहेत. सहा महिन्यात २४ हत्या होणे, हे कोणत्याही पोलीस दलासाठी शोभनीय नक्कीच नाही. संशयितांना ताब्यात घेवून त्यांची त्या परिसरात मिरवणूक (धिंड) काढणे एवढेच काम न करता गुंडांना कायस्वरुपी जरब बसेल, अशी कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने गुंडांचे फावले आहे. अशा परिस्थितीत नाशिककरांना सुमारे १२ वर्षांपूर्वीचा काळ आठवतो. फेब्रुवारी २०१२ मध्ये कुलवंतकुमार सरंगल यांनी नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कारभार हाती घेतला तेव्हा नाशिककर गुन्हेगारीमुळे हैराण झाले होते. सातपूर, सिडको, अंबड या भागात गुन्हेगारीने कळस गाठला होता.
टिप्पर गँगच्या गुंडांची दहशत इतकी होती की, कोणी तक्रार देण्यासही पुढे येत नव्हते. कोणालाही घरात घुसून मारहाण केली जात होती. अशावेळी सरंगल यांनी टिप्पर गँगचा बिमोड करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या. आपल्या सहकाऱ्यांना तसे आदेश दिले. टिप्पर गँगच्या एकेकाला त्यांच्याच भागात भर रस्त्यात बदडण्यास पोलिसांनी सुरुवात केली. जिथे आपली दहशत, तिथेच सर्वांसमोर मार खावा लागत असल्याने अनेक गुंडांनी शहरातून पलायन केले. गुन्हेगारांवर वरदहस्त ठेवणाऱ्या राजकारण्यांचीही सरंगल यांनी कधीच गय केली नाही. तत्कालीन काही नगरसेवक, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सरंगल यांनी कसे फटकारले होते, याचे अनेक किस्से आहेत.
याचा जो परिणाम होणे अपेक्षित होते, तोच झाला. नाशिकमध्ये गुंडांचा नव्हे तर, पोलिसांचा दरारा निर्माण झाला. टिप्परचे तर कंबरडे मोडले. एकूण ५७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या टिप्परच्या नऊ जणांना पोलीस आयुक्त सरंगल यांनी मकोका लावला. सरंगल यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती. इतकेच नव्हे तर, त्याकाळी डी. एस. स्वामी, गणेश शिंदे यांसारखे पोलीस उपायुक्तही लोकप्रिय झाले होते. तशीच जरब पोलिसांनी आज नाशिकमध्ये बसविण्याची गरज आहे. अन्यथा, परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.