नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध प्रकल्पांत आपल्या २५ टक्के रकमेची व्यवस्था करण्यासाठी महानगरपालिका २०० कोटींचे स्वच्छ गोदावरी म्युनिसिपल कर्जरोखे (बाँड) तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटींचे हरित कर्जरोखे (ग्रीन बाँड) असे एकूण ४०० कोटींचे कर्जरोखे काढणार आहे.
गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेने विविध विकास कामांचा सुमारे १५ हजार कोटींचा आराखडा शासनाकडे सादर केला आहे. यातील अधिक कालावधी लागणाऱ्या काही प्रकल्पांना मान्यता मिळाली असून यात एकूण रकमेच्या २५ टक्के हिस्सा महापालिकेला द्यावा लागणार आहे. कायमस्वरूपी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा विचार करता ही रक्कम अंदाजे हजार कोटींच्या आसपास आहे. मागील कुंभमेळ्यात महापालिकेला साडेतीनशे कोटींचे कर्ज काढून निधीची व्यवस्था करावी लागली होती, असा दाखला मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिला. यावेळी कर्जरोख्यांचा मार्ग अवलंबला गेला आहे. गोदावरी नदी आणि रामकुंड परिसर स्वच्छतेसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे नियोजन आहे. यासाठी २०० कोटींचे स्वच्छ गोदावरी महानगरपालिका कर्जरोखे तर पाणीपुरवठा योजनेसाठी तितकेच म्हणजे २०० कोटींचे हरित (ग्रीन बाँड) कर्जरोखे काढण्यात येणार आहेत. स्वच्छ गोदावरी कर्जरोखे या महिन्याच्या अखेरीस बाजारात येणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी नमूद केले.
एकप्रकारे बिनव्याजी कर्ज…
या माध्यमातून भांडवल उभारणीमुळे महापालिकेला अमृत प्रोत्साहनपर बक्षीस आणि अर्बल चॅलेंज फंड’ यातून प्रोत्साहनपर रक्कम अशी प्रत्येक कर्जरोख्यापोटी सुमारे ७६ कोटींची रक्कम मिळणार आहे. कर्जरोख्यांसाठी पाच ते सात वर्षात जे व्याज द्यावे लागेल, तेवढी रक्कम यातून उपलब्ध होईल. म्हणजे एकप्रकारे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होईल. शासनाचा निधी वाचेल आणि महापालिकेला फायदा होणार असल्याचा दावा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केला. ट्रक टर्मिनस उभारणी, प्रदर्शन केंद्र अशा प्रकल्पांसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वाचा अवलंब केला जाणार आहे.
