मालेगाव : नवीन वीज जोडणीसाठी ५० हजाराची लाच स्वीकारताना येथील मालेगाव पाॅवर सप्लाय लिमिटेड या खासगी वीज वितरण कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईच्या निमित्ताने शहरात वीज वितरणाचा ठेका घेतलेल्या खासगी कंपनीचा वादग्रस्त कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
तक्रारदार यांना येथील सर्वे नंबर २६० मधील गोदामामध्ये व्यावसायिक वीज जोडणी हवी होती. त्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीकडे ऑनलाईन अर्ज केला. त्यासाठी आवश्यक ते शुल्क भरले. त्यानंतर मालेगाव पाॅवर सप्लाय लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात त्यांनी संपर्क केला. तेव्हा देवीच्या मळा भागातील जागेवरील विजचोरीचे एक लाख २६ हजार ३२४ व दंडात्मक ४० हजार असे एकूण एक लाख ६६ हजार ३२४ रुपये देयक भरण्यासाठी त्यांना बजावण्यात आले. कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ज्या जागेवरील वीज चोरीसंदर्भात देयक भरण्यास बजावले, त्या जागेशी किंवा त्या विजचोरीशी आपला किंवा कुटुंबातील सदस्यांचा काहीच संबंध नाही, हे तक्रारदाराने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
व्यवसायासाठी वीज जोडणीची निकड असल्याने तक्रारदार हे या कंपनीच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत राहिले. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी हे प्रलंबित देयक भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी मिळणार नाही, यावर ठाम राहिले. दरम्यान, कंपनीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस असलेला खासगी इसम शेख सुलतान शेख अक्रम याने हे प्रलंबित देयक न भरता वीज जोडणीसाठी ८० हजाराची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजारात हे काम करून देण्याचे उभयपक्षी नक्की झाले. दरम्यान, या प्रकाराने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने या संदर्भात नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक भारत तांगडे व अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंपनीच्या मुख्य कार्यालयात सापळा रचून शेख सुलतान याला ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. या पथकात हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक विलास निकम, परशुराम गायकवाड यांचा समावेश होता.
रोगापेक्षा इलाज जालीम..
या कंपनीच्या कारभाराला शहरातील वीज ग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. वीज जोडणी वेळेवर न मिळणे, ग्राहकांच्या माथी अवाजवी वीज देयक मारणे, त्या संदर्भातील तक्रारींना बेदखल करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी उद्दामपणाचे वर्तन करणे, वारंवार वीजपुरवठा खंडित असणे, या व यासारख्या विविध तक्रारी दिवसागणिक वाढत आहेत. त्या संदर्भात ग्राहकांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली. गेल्या वर्षी मंत्री दादा भुसे यांनी या तक्रारींच्या अनुषंगाने ग्राहकांसोबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला होता. तेव्हा कारभारात सुधारणा करण्याचे जाहीर आश्वासन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन खुंटीवर टांगले गेल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. पूर्वीच्या महावितरण कंपनीच्या कार्यकाळात वीज चोरी वाढली म्हणून मालेगावात वीज वितरणाचे खासगीकरण करण्यात आले. मात्र या कंपनीचा कारभार बघितल्यावर रोगापेक्षा इलाज जालीम झाला आहे, अशी प्रतिक्रिया आता ग्राहकांकडून दिली जात आहे.