नाशिक : जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी पावसाचा जोर अधिकच वाढल्याने सर्वत्र दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते व चौक जलमय झाले. ग्रामीण भागात वेगळी स्थिती नाही. घाट माथ्यावर भागात मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. झाडांची पडझड, वीज पुरवठा खंडित होण्याची मालिका कायम आहे. ऐन उन्हाळ्यात अतिवृष्टीसारख्या स्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी येथील उड्डाण पुलाच्या पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडले.
दरवर्षी जूनमध्ये पावसाला सुरुवात होते अनेकदा तो काही दिवस हुलकावणी देतो. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू झाल्याची स्थिती आहे. मागील नऊ दिवसांपासून तो सातत्याने बरसत आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने त्याची सुरूवात होऊन आता त्याने रौद्र स्वरुप धारण केले. मंगळवारी घाटमाथ्यावरील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक शहर व आसपासच्या भागात त्याने पुन्हा हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वहात होते. सखल भागातील अनेक चौक व रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आल्याने वाहतुकीत अडथळे आले. या भागात वाहने पाण्यात बंद पडत होती. रस्त्यांची अवस्था बिकट होत आहे. सिटी सेंटर मॉलसमोर दुपारी झाड कोसळल्याने मॉल परिसरासह लवटेनगर, क्रांतीनगर, संभाजी चौक परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. गोविंदनगर, आर. डी. चौकातील विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने तशीच स्थिती निर्माण झाली. वीज अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
घाटमाथ्यावरील भागात पावसाचा जोर वाढला. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वसह इगतपुरीमध्ये त्याने जोरदार हजेरी लावली. सुरगाणा तालुक्यात काही नाल्यांना जणू पूर आल्याचे दिसत आहे. सततच्या पावसाने घेवडा व कांदा पिकांना मोठा फटका बसला.
घोटी उड्डाणपूल परिसरात वाहतूक कोंडी
मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील सिन्नर फाटा उड्डाणपूलालगतच्या पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहने नादुरुस्त होत आहेत. लहान-मोठे अपघात घडतात. पुलावर व रस्त्यावर पथदीप नसल्याने पाण्यातून मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरत आहे. या परिसरात तलावासारखी स्थिती झाल्याने लहान-मोठ्या वाहनांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागते्. काही वाहने पाण्यात अडकून पडतात. वाहतूक विस्कळीत झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून प्रवाशांचे हाल होत आहेत.