नाशिक – आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने एकेकाळी नाशिकचे नाव गाजवले. सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कविताने आशियाई, राष्ट्रकुलसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करीत ग्रामीण भागातून आलेली खेळाडू काय कमाल करु शकते, हे दाखवून दिले. कविता राऊतचा आदर्श घेऊन मोनिका आथरे, संजीवनी जाधव यांनीही विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविली. या सर्वांची आठवण येण्याचे कारण म्हणजे नाशिकमधून अजून एक नाव आंतरराष्ट्रीय पातळी गाजविण्यासाठी पुढे आले आहे.
बहारिन येथे तिसरी युवा क्रीडा स्पर्धा २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या संघामध्ये नाशिकच्या भूमिका नेहते हिची निवड झाली आहे. भूमिका नेहते २०० मीटर धावणे आणि ४ बाय १०० मीटर रिले या दोन प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. याआधी भुवनेश्वर येथे ४० व्या कनिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भूमिकाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी २०० मीटर धावणे या प्रकारासाठी आवश्यक असलेल्या वेळेपेक्षा कमी म्हणजे २४.४२ सेकंद या वेळेत हे अंतर पूर्ण करून भारतीय संघामध्ये आपली निवड निश्चित केली. याआधीही पाटणा येथे आयोजित खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेमध्येही भूमिकाने २०० मीटर धावणे प्रकारात पहिला क्रमांक मिळविला होता. या सुवर्ण कामगिरीमुळे भूमिकाची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबीर बंगळुरु येथे [पार पडले.
याआधी नाशिकच्या ॲथलेटिक्स खेळाडूंनी आत्तापर्यंत लांब पल्ल्याच्या शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु कमी अंतराच्या २०० मीटर प्रकारात भारताच्या संघामध्ये निवड होणारी भूमिका नेहते ही पहिली खेळाडू ठरली आहे. या प्रकारातही नाशिकचे नाव गाजविण्याची संधी भूमिकाला मिळाली आहे. भूमिका ही पाच वर्षांपासून एन.आय. एस. प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे नियमित सराव करत आहे. भूमिकाबरोबर सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. भूमिका या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशीच चांगली कामगिरी करून कमी अंतराच्या स्पर्धेतही नाशिकचे धावपटू कमी नाहीत हे सिद्ध करेल, असा विश्वास सिद्धार्थ वाघ यांनी व्यक्त केला. भूमिका नेहतेच्या या उत्तम कामगिरीची दखल घेऊन नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी यांनी अभिनंदन केले आहे.
