नाशिक – शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे) ‘सेल्फी विथ खड्डा’ या उपक्रमासह निषेधात्मक आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. अनेक रस्त्यांची अशी अवस्था आहे की, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, हेच कळेनासे झाले असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना भेडसावणारा खड्ड्यांचा विषय राजकीय पक्षांकडून ऐरणीवर आणला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला. मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील प्रमुख व कॉलनीतील लहान-मोठ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु, काही दिवसात पुन्हा तशीच स्थिती निर्माण होत आहे.
खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाने मनपा प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील प्रमुख रस्त्याचे अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम,सातपूर, सिडको या सर्व विभागातील प्रमुख रस्त्यांसह कॉलनी रस्त्यांवर असंख्य खड्डे पडलेले आहेत. काही रस्त्यांची अशी अवस्था आहे की, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच कळेेनासे झाले आहे.
खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी भरल्याने ते दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक जखमी झाले आहेत. ही परिस्थिती म्हणजे नागरिकांना आपला जीव गमावण्याच्या मार्गावर ढकलले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची अवस्था वेगळी नाही. रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून याचा निषेध करण्यासाठी सेल्फी विथ खड्डा उपक्रम सुरु करण्यात आला.
नागरिकांना आपल्या भागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढून समाजमाध्यमात प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, सर्व प्रभागातील प्रमुख रस्ते, कॉलनी रस्ते, महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, या कामासाठी कालमर्यादा निश्चित करावी, रस्त्यांची दुर्दशा होण्यास जबाबदार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, मुदतीत खड्डे बुजवले गेले नाहीत, तर ‘सेल्फी विथ खड्डा’च्या पुढील टप्प्यात मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा उपनेते दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आदींनी दिला आहे.
दुरुस्तीत पावसामुळे अडथळे
एरवी चकचकीत दिसणारे रस्ते पावसाळ्यात पूर्णत: बदलतात. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत मनपाच्या सर्वेक्षणात शहरात १० हजार खड्डे असल्याचे उघड झाले होते. मार्चपर्यंत ते बुजविण्याचे काम होणे अपेक्षित होते. काही प्रमाणात ते झाले. काहीअंशी बाकी राहिले. गॅस वाहिनी तसेच तत्सम कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले. त्यामुळे नव्याने खड्डेमय रस्त्यांची भर पडली. १५ मे नंतर पावसाळापूर्व रस्ते आणि खड्डे दुरुस्तीची कामे करण्याची तयारी करण्यात आली. महापालिकेने याकरिता सुमारे ९० कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याचे सांगितले जाते. परंतु, मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यामुळे डांबरीकरणातून कायमस्वरुपी रस्ता दुरुस्तीची कामे झाली नाहीत. या सर्वांचा परिणाम रस्त्यांच्या दुरावस्थेवर दिसत आहे. सातत्याने होणाऱ्या पावसात डांबरीकरणातून रस्ता दुरुस्ती वा खड्डे बुजवण्याचे काम वेगात पुढे सरकले नाही. त्यामुळे तात्पुरत्या मलमपट्टीचा मार्ग अवलंबला गेला. या पद्धतीने बुजविलेले खड्डेही पावसात उघडे पडतात.