धुळे : आगामी धुळे महानगर पालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर लढेल अशी घोषणा सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार फारुक शाह यांनी इकडे केली आणि दुसरीकडे समितीचे उपाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांनी समितीच्या बाहेर ठेवा असे आवाहन केले. ही अनपेक्षित घाडामोड खुद्द समितीच्याच भविष्याविषयी साशंकता निर्माण करणारी ठरली आहे.
संतोषी माता मंदिराजवळील गुलमोहर विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत सुकाणू समितीचे अध्यक्ष फारुक शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व १९ प्रभागांतील ७४ जागांचा आढावा घेण्यात आला. त्यात मुस्लिम बहुल भागात राष्ट्रवादीने सर्व जागांवर दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फारुक शाह म्हणाले, “धुळे महानगर पालिकेत आमचा जनाधार मजबूत असून कार्यकर्ते उत्साही आहेत. स्वबळावर लढविल्यास नक्कीच राष्ट्रवादीचा महापौर निवडून येईल. शहरातील प्रत्येक प्रभागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.” मात्र, अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस माजी आमदार प्रा. शरद पाटील, सुनील नेरकर, जोसेफ मलबारी, गणेश जाधव, रवींद्र आघाव, कैलास चौधरी, डॉ. सर्फराज अन्सारी, उमेश महाजन, प्रमोद साळुंखे, दीपश्री नाईक, कांतीलाल दाळवाले, संजीवनी गांगुर्डे, जया साळुंखे, महेंद्र शिरसाठ, निलेश चौधरी, नजीर शेख, आनंद सैंदाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचा सुकाणू समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय बैठकीत चर्चेचा विषय ठरला. त्यांना समितीचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते, मात्र त्यांनी “मला पदात अडकवू नका, कार्यकर्ता म्हणूनच मैदानात उतरू द्या. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्या असे पाटील यांचे म्हणणे त्यांनी साऱ्यांसमोर मांडले. शरद पाटील म्हणाले, “समिती ही निवडणुकीपुरती मर्यादित आहे. मी धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांत पक्षाचे काम वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. कार्यकर्ता म्हणून पक्षाचे बळ वाढविणे हीच खरी जबाबदारी आहे.” त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात चैतन्य निर्माण झाले असून नवीन नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फारुक शाह यांच्या स्वबळाच्या घोषणेने धुळे महानगर पालिका निवडणुकीची दिशा बदलू शकते तर दुसरीकडे शरद पाटील यांचा समितीतून बाहेर पडणारा निर्णय नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी ही शहरातील राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडींवर प्रकाश टाकते. त्यामुळे धुळेतील आगामी निवडणुका आता अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक ठरण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
