नाशिक:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत मुंबईत झालेल्या बैठकीत कांद्याशी संबंधित मागण्यांवर केवळ चर्चा झाली. एकही ठोस निर्णय झाला नाही. यामुळे बुधवारीही व्यापारी लिलावात सहभागी न झाल्यामुळे जिल्ह्यातील कांदा कोंडी सातव्या दिवशीही कायम राहिली. कांदा व्यापारी संघटनेची शुक्रवारी बैठक होणार आहे. यात सर्वाशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेतला जाईल असे संघटनेने म्हटले आहे. दुसरीकडे प्रशासन लासलगाव बाजाराच्या विंचूर उपबाजारात काही व्यापाऱ्यांच्या मदतीने गुरुवारपासून लिलाव सुरू करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यापारी लिलावातून बाहेर पडल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव आठवडाभरापासून ठप्प आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेअंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लिलाव पूर्ववत करण्याचे आवाहन केले होते. त्यास व्यापाऱ्यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही. सात दिवसांत सुमारे सात लाख क्विंटल कांद्याचे लिलाव झाले नाहीत. सुमारे दीडशे कोटींची उलाढाल थंडावली. शेतकऱ्यांना कांदा विकणे अवघड झाले आहे. मुंबईतील बैठकीनंतर प्रशासनाने लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात लिलाव सुरू करण्याचे नियोजन केले.

गुरुवारपासून तिथे कांदा खरेदी सुरू होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांनी सांगितले. शासनाकडे दोन हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असून त्यांच्यामार्फत त्यांनी कांदा खरेदी करावा, असा सल्ला संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिला. लिलाव बंद ठेवा, असे संघटनेने कधीही म्हटलेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उपमुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेची माहिती शुक्रवारी संघटनेच्या सभासदांसमोर मांडून लिलावाबाबत पुढील धोरण निश्चित केले जाणार असल्याचे व्यापारी संघटनेने म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion crisis continues in nashik auction in a submarket starting today ysh