नाशिक – चाकरमान्यांची भिस्त असणारी मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आणि हुजुरसाहेब नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला वारंवार विलंब होत आहे. याची दखल सरकारने घेतली का, विलंबाची कारणे आणि पुढील काळात तो टाळण्यासाठी केलेल्या उपायांविषयी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रश्न उपस्थित केले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या गेल्या तीन महिन्यांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा वेळेवर धावल्याचे म्हटले आहे. म्हणजे केवळ २० टक्के वेळा त्यांना विलंब झाल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

विविध कामांनिमित्त मुंबईला दैनंदिन ये-जा करणाऱ्यांची मुख्य भिस्त मनमाड – नाशिक – मुंबई पंचवटी एक्स्प्रेसवर असते. एक-दोन वर्षांपासून ही गाडी वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सकाळी सात वाजता नाशिकरोडला येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसची मुंबई पोहोचण्याची वेळ १०.४५ वाजता आहे. परंतु ती वेळापत्रकाचे पालन करीत नसल्याचा आक्षेप आहे. पंचवटीआधी मुंबईला जाणाऱ्या नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसलाही अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. सकाळी ६.१२ वाजता ती नाशिकरोड स्थानकात येते. मुंबई तिची पोहोचण्याची वेळ १०.०७ आहे. तथापि, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी या दोन्ही गाड्या थांबवून ठेवल्या जातात, अशी प्रवासी संघटनांची तक्रार आहे. या संदर्भात खा. वाजे यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्न मांडला होता. विलंबाने धावणाऱ्या या रेल्वे सकाळी साडेनऊच्या आधी सीएमएसटीला पोहोचू शकल्या तर, प्रवाशांना मदत होईल , याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे वेळेवर चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे. धुके, मार्गावरील अडचणी वा बिघाड, साखळी खेचणे, आंदोलने याचा गाड्या वेळेवर धावण्याशी त्यांनी संबंध जोडला. गुरेढोरे, अपघात व अनपेक्षित परिस्थिती गाड्या वेळेवर धावण्यात अडथळे आणतात. परिस्थिती पाहून अल्पकालीन, दीर्घकालीन उपाययोजना सुरू केल्या जातात. मनमाड-मुंबई पंचवटी आणि नांदेड-मुंबई राज्यराणी या दोन्ही गाड्यांनी गेल्या तीन महिन्यात ८० टक्के पेक्षा जास्त वेळेचे पालन केल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सूचित केले.

या रेल्वेगाड्यांची प्रवास वेळ कमी करण्यासाठी काही विचार होतोय का आणि त्यामध्ये अनारक्षित डब्यांची संख्या वाढवली जाईल का, या प्रश्नावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सद्यस्थिती मांडली. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये २२ बोगी असून यातील नऊ सर्वसाधारण तर दोन बोगी मासिक पासधारकांसाठी आहेत. राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये १७ बोगी असून यातील चार सर्वसाधारण आहेत. रेल्वेगाड्यांचा वेग वाढविणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.