लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: इगतपुरी प्रकरणात मुलीचे प्रियकरासोबत पलायन सहन न झाल्याने आई- वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, मयतांचा अंत्यविधी योग्य ठिकाणी न केल्याच्या कारणावरुन मुलीचे नातेवाईक, ग्रामस्थांविरुध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील निवृत्ती खताळे हे पत्नी मंजुळा आणि मुलीसोबत सिन्नर येथे आले होते. पांढुर्लीमार्गे इगतपुरीकडे दुचाकीने जात असतांना काही जणांनी मुलीचे अपहरण केले. मुलीचे अपहरण झाल्याने बदनामीच्या भीतीने खताळे दाम्पत्याने रेल्वेखाली आत्महत्या केली.
हेही वाचा… नाशिक: जीर्ण १११२ वाडे, इमारतींना नोटीसचा सोपस्कार – मनपाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित
संशयित समाधान झनकरविरोधात मुलीचे अपहरण तसेच खातळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खताळे यांच्या आत्महत्येमुळे संतप्त नातेवाईकांनी त्यांचा अंत्यविधी नेहमीच्या ठिकाणी न करता संशयिताच्या घरासमोर केला. त्यामुळे खताळे यांचे नातेवाईक तसेच ग्रामस्थांविरूध्द घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.