नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त शहरात येत आहेत. पंचवटीतील निलगिरी बाग येथील मोकळ्या जागेत त्यांचे हॅलिकाॅप्टर उतरणार असून त्यानंतर रोड शो करत ते तपोवन मैदानावर जाणार आहेत. निलगिरी बाग मैदानावर हेलिकाॅप्टर उतरण्याची आणि उड्डाणाची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मैदानात गर्दी केल्याने गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांची धावपळ उडाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तपोवन मैदानात युवा महोत्सवाचे उदघाटन आणि जाहीर सभा असे दोनच कार्यक्रम प्रारंभी होते. परंतु, बुधवारी दौऱ्यातील कार्यक्रमांमध्ये वाढ झाली असून पंतप्रधानांच्या हस्ते गोदावरी नदीची पूजा, महाआरती आणि श्रीकाळाराम मंदिरात महाआरती होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकाॅप्टर निलगिरी बाग परिसरातील मैदानावर उतरणार आहे.

हेही वाचा… युवा महोत्सव की धार्मिक महोत्सव?

हेलिकाॅप्टर उतरण्याची आणि उड्डाणाची रंगीत तालीम बुधवारी घेण्यात आली. मैदानात अचानक हेलिकाॅप्टर उतरु लागल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. नागरिकांच्या उत्साहाला लगाम घालण्याचे काम पोलिसांना करावे लागले.