नाशिक : इगतपुरी येथील कर्ज वसुली करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध व्यवसायांविरूध्द यापुढेही कारवाई सुरू राहील, असा इशारा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे.
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरूध्द पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दारूभट्टी, जुगार याव्यतिरिक्त आता पांढरपेशा पध्दतीची गुन्हेगारी ग्रामीण भागात सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यात अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या विविध कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.
इगतपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सारिका अहिरराव यांना आणि त्यांच्या पथकाला इगतपुरीतील मीनाताई ठाकरे संकुलात अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली. इगतपुरी पोलिसांनी छापा टाकला असता अवैधरित्या कामे करण्यात येत असल्याचे दिसले. क्रेडीट कार्डद्वारे देण्यात आलेले कर्ज, गृह कर्ज आणि इतर कर्जाची वसुली करण्यासाठी खातेदार आणि त्यांचे नातेवाईक, मित्र, शेजारी यांच्याशी बनावट नावाने संपर्क साधण्यात येत असे.
संगणक, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे भ्रमणध्वनी असा २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याठिकाणी ४० ते ५० जण काम करत होते. अवैधरित्या कर्ज खातेदारांची माहिती संकलित करण्यात येत होती. इगतपुरी पोलिसांनी कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र भोंडवे (३२, रा. इगतपुरी), पारस भिसे (२६, रा. घाटकोपर) यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १९ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
बँक अधिकाऱ्यांची बैठक
इगतपुरी येथील मीनाताई ठाकरे संकुलात अवैधरित्या कॉल सेंटर सुरू होते. या केंद्रावर विविध वित्तीय संस्थांच्या कर्ज वसुलीकरता काम सुरु असल्याचे दिसून आले. सायबर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते पुढील तपास करत आहे. दरम्यान, कारवाईत ज्या बँकेचे कागद सापडले त्यांच्याशी पोलिसांकडून संपर्क करण्यात येत आहे. शुक्रवारी या संदर्भात बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले