मालेगाव : भुयारी गटाराचे काम करताना ठेकेदाराकडून सुरक्षा नियमांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने शहरात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना अधून मधून घडत आहेत. गेल्या आठवड्यात या कामासाठी खोदलेल्या चेंबरच्या खड्ड्यात पडून एका तरुणाला जीव गमवावा लागला. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याची तक्रार करत याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी समाजवादी पार्टीतर्फे मालेगाव महापालिकेसमोर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.
सुमारे ५०० कोटी खर्चाचे हे काम मार्च २०२४ पासून सुरू झालेले आहे. हे काम करीत असताना कोणतेही अपघात घडू नये म्हणून ठेकेदाराने बॅरिकेटींग करणे, दिशादर्शक फलक व संरक्षक पट्ट्या लावणे, यासारख्या आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करणे, करारातील अटी शर्तींनुसार बंधनकारक आहे. मात्र अशा उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी शहरवासीयांकडून सुरुवातीपासून केल्या जात आहेत. याशिवाय गटार काम पूर्ण झाल्यावर खोदून ठेवलेल्या रस्त्यांची नीट दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे जागोजागी खड्डे निर्माण झाल्याचे चित्र आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्याचा लोकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. गटारीसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात अपघात घडत आहेत.
गटाराच्या खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून काही दिवसांपूर्वी एका गर्भवतीचा गर्भपात होण्याची घटना घडली होती. अशाच अपघातामुळे एका व्यक्तीला अपंगत्व आले. गटार कामासाठी जेसीबी यंत्राद्वारे चारी खोदताना खबरदारी न घेतल्याने एका इमारतीला धोका निर्माण झाला. गटाराच्या चेंबरसाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पाणी भरल्याने अंदाज न आल्यामुळे गेल्या १७ सप्टेंबर रोजी दुचाकीवरून जाणारा हाफिज जिया उर रहेमान हा २२ वर्षीय तरुण त्यात पडून गंभीर जखमी झाला. नंतर उपचार सुरू असताना त्याचे निधनझाले होते.
भुयारी गटार कामाच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात घडत असल्याचा आक्षेप घेत हाफिजच्या मृत्यूला जबाबदार धरत ठेकेदाराविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा, त्याच्या वारसांना २५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी, अटी-शर्तींचा भंग झाल्याने सदर ठेका रद्द करावा, खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, ठेकेदाराला देयके अदा करू नयेत, आदी मागण्यांसाठी समाजवादी पार्टी युवा शाखेचे प्रदेश सरचिटणीस मुस्तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी महापालिका व ठेकेदाराच्या कार्यपद्धतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आसमंत दणाणून सोडले होते.
उपायुक्त गणेश शिंदे, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता सचिन माळवाळ यांनी आंदोलकांशी चर्चा करून समजूत घातली. सुरक्षाविषयक उपायोजना करणे, नादुरुस्त रस्ते दुरुस्त केल्याशिवाय नव्याने गटार काम सुरू करण्यास ठेकेदारावर निर्बंध घालणे, अटी शर्तींचे पालन झाल्याशिवाय देयके अदा न करणे, अशा स्वरूपाची लेखी हमी महापालिका प्रशासनातर्फे यावेळी आंदोलकांना देण्यात आली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.