मालेगावात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; हाणामारी प्रकरणाविषयी बेपर्वाई

काही दिवसांपासून या डॉक्टर दाम्पत्यामधील कौटुंबिक वाद विकोपाला गेला आहे. सहा महिन्यांपूर्वी उभय गटांत कडाक्याचे भांडण झाले.

police
संग्रहित छायाचित्र

प्रल्हाद बोरसे

मालेगाव : येथील डॉ. किरण  व डॉ. वेलंतीना पाटील या दाम्पत्याच्या कौटुंबिक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीमुळे शहरात निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळताना पोलिसांनी बेपर्वाई दाखविल्याचे अधोरेखित होत असून त्यामुळे मालेगावातील पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 काही दिवसांपासून या डॉक्टर दाम्पत्यामधील कौटुंबिक वाद विकोपाला गेला आहे. सहा महिन्यांपूर्वी उभय गटांत कडाक्याचे भांडण झाले. त्याची परिणती दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारीत झाली होती. त्या वेळी उभय गटांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारींनुसार पोलिसांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर संबंधित डॉक्टरचे वास्तव्य बाहेरगावी असल्याचे सांगितले जाते. गेल्या गुरुवारी संबंधित डॉक्टर महिला आणि पुरुष सुरक्षारक्षकांसह शहरात दाखल झाला. डॉक्टर पत्नीचे वास्तव्य असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचा ताबा मिळविण्याचा त्याने जोरकस प्रयत्न केला. त्यास विरोध झाल्याने पुन्हा भांडणास सुरुवात झाली. या वेळी या खासगी सुरक्षारक्षकांनी महिला डॉक्टरला मारहाण केली. इतकेच नव्हे तर डोक्याचे केस ओढत तिला रुग्णालयाबाहेर काढण्यापर्यंत या सुरक्षारक्षकांची मजल गेल्याचे सांगितले जाते.

बाहेरगावाहून आलेले सुरक्षारक्षक या महिला डॉक्टरला मारहाण करीत असल्याची खबर मिळाल्यावर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना भिडले. या बातमीमुळे संतप्त झालेले शहरातील अन्य समर्थकही या महिलेच्या बाजूने उभे राहिले. या वेळी उभय गटांत तुंबळ मारहाण सुरू झाली व दोन्ही गटांतील काही जण त्यात गंभीर जखमी झाले. रुग्णालय इमारतीत सुरू झालेले हे भांडण काही काळाने रुग्णालयाच्या बाहेर सटाणा रस्त्यापर्यंत गेले. मारहाण करणाऱ्यांच्या गर्दीमुळे सदर रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाल्याचे बघावयास मिळाले.

जवळपास सव्वा ते दीड तास मारहाणीचा हा गंभीर प्रकार सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. मात्र इतका वेळ हा गोंधळ सुरू असताना घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छावणी पोलिसांनी या प्रकाराला अटकाव करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून आले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दोन गटांतील तुंबळ मारहाणीचा हा प्रकार सुरू होऊन तासाभराचा कालावधी उलटल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याबद्दलही अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना पोलिसांनी काही काळ बघ्याची भूमिका घेतली का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल होण्यामुळे स्थानिक पत्रकार शंकर वाघ यांच्यावरही जमावाकडून लक्ष्य होण्याची वेळ आली. रस्त्यावर आलेल्या जमावामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचे छायाचित्र वाघ यांनी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे टिपण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने जमावातील पंधरा ते वीस जणांनी त्यांना मारहाण केली. ही छायाचित्रे नष्ट करण्यासाठी दमदाटी करत त्यांचा भ्रमणध्वनी हिसकावून घेण्यात आला. तब्बल तासाभरानंतर हा भ्रमणध्वनी परत करण्यात आला. या संदर्भात वाघ यांच्या तक्रारीनुसार छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी सहा दिवस उलटल्यावरही संशयितांना अटक करणे पोलिसांना शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दलचा संशय आणखी गहिरा होत आहे.

मारहाण सुरू झाल्यावर संबंधित डॉक्टर महिलेने पोलिसांकडे मदतीची याचना केली होती. तसेच तिच्या काही नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात समक्ष जाऊन घटनास्थळी तातडीने पोलिसांचा फौजफाटा पाठविण्याची विनंती केली होती. मात्र त्याकडे पोलिसांनी काणाडोळा केला. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले असते तर अनर्थ टळला असता. तेव्हा या प्रकरणातील दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई व्हावी.

– दिनेश ठाकरे (अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मालेगाव शहर)

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Question marks police efficiency indifference issue violence ysh

Next Story
‘नॅब’तर्फे अंधशाळेचे मार्गक्रमण डिजिटल स्कूलच्या दिशेने; ई-लायब्ररीही सुरू करणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी