नाशिक – आगामी कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात भेट देत या पक्षाचे आमदार आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.
पक्षभेद बाजुला ठेवून नाशिकसाठी एकसंघपणे काम करता येईल, केंद्र- राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवणे व विकासाचे प्रकल्प कसे आणता येतील, याबाबत सविस्तर चर्चा झाली. आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी खासदार वाजे यांनी संवाद साधला. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अद्याप कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाही. प्रस्तावित रस्ते, वळण रस्ते, नाशिकरोड-द्वारका उड्डाणपूल, नाशिक-पुणे रेल्वे, आरोग्य व्यवस्था, शहरातील विविध विकासकामे आदींसाठी शासन दरबारी एकत्रितरित्या बाजू मांडण्याबाबत उभयतांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जाते. राजकारण बाजूला ठेऊन नाशिकचा विकास समोर ठेऊन कामकाज केले पाहिजे, असे मत यावेळी मांडण्यात आले.
लोकप्रतिनिधी हा निवडून आल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा प्रतिनिधी असतो. सर्वच लोकप्रतिनिधींनी एक संघ म्हणून काम केल्यास आपल्याला नाशिकचा चांगला विकास साधता येईल. कुंभमेळा देखील यशस्वी पद्धतीने पार पाडता येईल. या भावनेतून आमदार आणि पदाधिकारी यांची भेट घेतली. आगामी आठवड्यात उर्वरित आमदार आणि पदाधिकारी यांना भेटणार आहे.- खासदार राजाभाऊ वाजे (नाशिक लोकसभा)
© The Indian Express (P) Ltd