नाशिक : शहरातील राणे नगर परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंगळवारपासून अखेर सुरू झाले. या कामासाठी तातडीने राणे नगर बोगदा बंद करण्यात आला. वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना यासंदर्भात कोणतीही सूचना नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे काम किती दिवस सुरू राहील, याविषयी संभ्रमात आहे. नाशिक वाहतूक पोलिसांनीही याबाबत कुठल्याही प्रकारची अधिसुचना न दिल्याने ऐन पावसाळ्यात काम का सुरु करण्यात आले, असा प्रश्न विचारला जात आहे.
उड्डाणपुलाखालील राणे नगर बोगदा अरुंद असल्याने या ठिकाणी कामाच्या वेळेत सकाळी तसेच सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होतो. नाशिकरोड तसेच नवीन नाशिक परिसरातून ये-जा करण्यासाठी बोगद्याचा वापर होतो. इंदिरा नगर येथील बोगद्यातून एकाच बाजूने वाहतूक होत असल्याने त्याचा ताण राणे नगर बोगद्यावर येतो.
सायंकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही वेळा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा पर्याय पुढे आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत मंगळवारी बोगद्यातील वाहतूक बंद करुन कामाला सुरुवात करण्यात आली.
सध्या काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या रहिवाशांना जवळपास दोन्ही बाजूने एक किलोमीटर वळसा घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. या भागात ‘प्रवेश बंद’चे फलक लावण्यात आले असून, सुरक्षेसाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या कामास किती कालावधी लागणार, याची कोणतीही स्पष्ट पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. तशा प्रकारचे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना या बदलामुळे अधिक त्रास होत असल्याचे चित्र आहे.
राणे नगर कडील बाजूकडून भुजबळ फार्मच्या बाजूकडील रस्त्याने ये-जा करण्यासाठी इंदिरा नगर बोगदा, राणे नगर बोगदा , लेखानगर चौफुली, पाथर्डी फाटा, मुंबई नाका ही ठिकाणे आहेत. यातील राणे नगर बोगदा बंद झाला. इंदिरा नगरकडून भुजबळ फार्मकडे येऊ शकतात. परंतु, जाता येत नाही. लेखा नगर चौफुलीवर मद्याची दुकाने, भाजीबाजार आहे. याशिवाय चौफुली असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने बऱ्याचदा कोंडी होते. अशा स्थितीत राणे नगर बोगदा बंद झाल्याने हा ताण अन्य भागावर येऊ लागला आहे. शिवाय वाहनचालकांसह पादचाऱ्यांना फेरा पडू लागला आहे.
राणेनगरचा बोगदा हा अरुंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रुंदीकरणामुळे ही समस्या सुटणार आहे. या कामामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. दोन दिवसात २० टक्के व्यवसाय कमी झाला. विद्यार्थी पालकांची वाट पाहत उभे राहतात. ज्येष्ठ नागरिकांना एवढे लांब पायी चालणे शक्य नाही. – दिनेश पाटील (हॉटेल व्यावसायिक)
राणेनगर बोगदा बंद करतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लेखा नगरच्या अलिकडे स्प्लेंडर हॉलसमोर उड्डाणपुलावरून उतरण्यासाठी व्यवस्था केली. ती दुसऱ्या बाजूनेही आहे. परंतु, यामुळे सर्व्हिस रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होतो. राणे नगर बोगदा बंद झाल्याने पाथर्डी फाटा येथील वाहतूक पोलिसांचा ताण वाढला. वाहनचालकांचे इंधन तसेच वेळ वाया जात आहे. वाहतूक वळविण्यासाठी अन्य पर्याय देता येईल का ? पोलिसी मनुष्यबळ वाढविण्याचा विचार व्हावा.- प्रकाश कोल्हे (मानवधन शैक्षणिक संस्था, पाथर्डी फाटा)
रस्ता रुंदीकरण कामाविषयी सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठावरून आवाज उठविण्यात आला. राणे नगरसह अन्य भागातील व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या. आता कामाला सुरूवात झाली. वाहतूक विभागाने अधिसुचना काढली आहे. लेखा नगर येथील चौपाटीचे काम काढल्यानंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती येईल. – दिलीप पाटील (व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नाशिक)