नाशिक – दिंडोरी तालुक्यातील शिवनई कॅम्पस येथे बांधण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राला आता नाशिक-दिंडोरी रस्त्याने प्रवेश रस्ता राहणार आहे. या उपकेंद्रावर जाण्यासाठी ढकांबेमार्गे १८ मीटरचा रस्ता नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) प्रस्तावित केला आहे. यामुळे उपकेंद्रावर जाण्यासाठीचे अंतर सुमारे तीन किलोमीटरने कमी होईल. पक्का व विस्तीर्ण रस्ता मिळाल्याने उपकेंद्रात ये-जा करणे सुलभ होईल.
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील ढकांबेजवळील शिवनई गावात ६३ एकर जागेवर विद्यापीठाचे उपकेंद्र उभारले जात आहे. सध्या कॅम्पसमध्ये जाण्यासाठी म्हसरूळ गावातून जाणाऱ्या अंतर्गत आणि अरुंद रस्त्यांद्वारे प्रवेश करावा लागतो. म्हसरूळ-वरवंडी-शिवनई मार्गे असलेला रस्ता लहान आणि ९.७ किलोमीटर अंतराचा असल्याने नाशिक- दिंडोरी महामार्गे ढकांबेकडून रस्ता मिळाल्यास विद्यार्थ्यांसाठी बससेवाही सुरू करता येईल. आणि अंदाजे तीन किलोमीटर अंतरही कमी होईल, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पाहणी दौऱ्यावेळी केली होती. या संदर्भात मंत्री पाटील यांनी एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. माणिक गुरसळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.
व्यवस्थापन परिषद सदस्य वैद्य, उपकेंद्र समन्वयक श्रीपाद बुरकुले यांनी प्राधिकरणाचे आयुक्त गुरसळ, उपायुक्त दिव्यांश सोनवणे यांच्याशी बैठकीत चर्चा केली. प्राधिकरण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेचे, रस्त्याचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. हा मार्ग ढकांबेपर्यंत राज्य महामार्ग असून तिथून सानप नर्सरीपासून उजवीकडे सध्या कच्चा रस्ताही वापरात आहे. प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला पत्र पाठवले. सध्या शिवनई हद्दीपर्यंत रस्ता तयार असून पुढील २०० मीटर अंतराचा रस्ता विद्यापीठापर्यंत तयार केल्यास नाशिक येथून विद्यापीठास जाणारा सर्वात कमी अंतराचा रस्ता तयार होईल. या रस्त्याचा खर्च करण्याचीही तयारी दर्शविली. एनएमआरडीए क्षेत्रातून जाणारे वर्गीकृत ग्रामीण रस्ते हे यापुढे १८ मीटर रुंदीचे करण्याचा प्रस्तावही एनएमआरडीएने जिल्हा परिषद व बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त रस्ता १८ मीटर विकास योजना रस्ता म्हणून प्रस्तावित करण्याची व्यवस्था ठेवल्याचे एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. माणिक गुरसळ यांनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील दोन लाखहून अधिक विद्यार्थी, २०० हून अधिक शिक्षणसंस्था आणि हजारो प्राध्यापकांचा विद्यापीठ उपकेंद्रापर्यंतचा प्रवास प्रशस्त रस्त्यावरून होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वैद्य यांनी म्हटले आहे. हे उपकेंद्र पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वाहतुकीचा अडसर दूर
म्हसरूळ गावापासून सध्याच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणाऱ्या सिटीलिंक अधिकाऱ्यांनी अतिशय अरुंद रस्त्यामुळे बससेवा चालविण्यास असमर्थता व्यक्त केली होती. सद्यस्थितीत नाशिकपासून १५. ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उपकेंद्राशी संलग्न सर्वांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अभाव आहे. नवीन दुव्यामुळे सुमारे तीन किलोमीटरने अंतर कमी होणार असून शिवाय नाशिक-दिंडोरी रस्त्याने थेट उपकेंद्रात प्रवेश मिळेल. जिथे सार्वजनिक वाहतुकीची चांगली उपलब्धता आहे.