जळगाव : तालुक्यातील बोरनार येथे मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दारूच्या नशेत संतापलेल्या पतीने पत्नीवर आधी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर अपराधी भावनेतून त्याने स्वतः थेट धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

आनंदा महारू धनगर (४२) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा धनगर आणि त्याची पत्नी रेखा यांच्यामध्ये नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत असत. घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी देखील आनंदा याने दारूच्या नशेत घरी येऊन पत्नीशी जोरदार वाद घातला. या वादाचे रुपांतर नंतर हिंसाचारात झाले. संतापलेल्या आनंदाने कुऱ्हाड उचलून पत्नीवर निदर्यीपणे वार केला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर आता जळगावमध्ये रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी रेखावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर आनंदा हा संतापात घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो जळगाव-मनमाड रेल्वे मार्गावरील म्हसावद स्थानकापासून जवळच असलेल्या फाटकावर गेला. तिथे कोणाचे लक्ष नसताना त्याने सकाळी सातच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना काही वेळाने लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ रेल्वेसह औद्योगिक वसाहत पोलीसांना माहिती दिली.

बोरनार येथील नवीन प्लॉट भागात आनंदा धनगर हा पत्नी रेखा तसेच विनोद आणि पप्पू या दोन मुलांसह वास्तव्याला होता. मंगळवारी सकाळी सहा वाजता त्याचे पत्नी रेखासोबत किरकोळ वाद झाले. नेहमीचे भांडण असेल म्हणून त्याकडे शेजाऱ्यांनी थोडे दुर्लक्ष केले. परंतु, त्या वादाचे पर्यावसन हादरून टाकण्याऱ्या घटनेत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आनंदा धनगर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात रवाना केला. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.