मालेगाव : बनावट कागदपत्रे व खोटे प्रतिज्ञापत्र देऊन बनावट जन्मदाखले प्राप्त करणाऱ्या तिघा संशयितांच्या विरोधात येथील छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही संशयित हे रोहिंगे किंवा बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गेली काही दिवस पाठपुरावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मालेगावला भेट दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालेगावात जवळपास चार हजार रोहिंगे व बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्म प्रमाणपत्रे प्राप्त केल्याची तक्रार लावून धरणारे सोमय्या हे १७ जानेवारी रोजी मालेगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी अशी प्रमाणपत्रे प्राप्त करणारे घुसखोर तसेच त्यांना मदत करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत म्हणून छावणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीत त्यांनी शंभर संशयित घुसखोरांची नावे नमूद केली होती. दोन आठवड्यानंतर पुन्हा मालेगावात दाखल होणारे सोमय्या हे थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या तिघांनी जन्म दाखला मिळवण्यासाठी जे पुरावे दिले, ते खोटे असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अन्य प्रकरणांची चौकशी सुरू असून त्यांचीदेखील जन्म प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न होईल, असा दावा सोमय्या यांनी माध्यमांकडे केला. आता अमरावती, अकोला अशा चार-पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी छावणी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचे समर्थन केले. धान्य पुरवठा अधिकारी कार्यालय, महापालिकेत जाऊन सोमय्या यांनी वितरित झालेल्या जन्म प्रमाणपत्रांबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मालेगावला जाण्याआधी सकाळी सोमय्या यांनी नाशिक येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेतली होती. बांगलादेशी घुसखोरांना बनावट जन्म दाखले तयार करण्यास मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

‘सोमय्या परत जा’च्या घोषणा

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या विरोधात अल्पसंख्यांक सुरक्षा समितीतर्फे येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘सोमय्या परत जा’ असा नारा आंदोलकांनी दिला. मालेगावात रोहिंगे व बांगलादेशी घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्रे दिल्याच्या कथित प्रकरणी विशेष तपासणी पथकाकडून (एसआयटी) चौकशी सुरू आहे. असे असताना सोमय्या हे वारंवार मालेगावात येतात आणि दिशाभूल करणारे विधाने करतात. त्यामुळे मालेगावची बदनामी होत असल्याचा समितीचा आक्षेप आहे. आंदोलनात माजी आमदार आसिफ शेख, समाजवादी पार्टीचे मुस्तकिन डिग्निटी, एजाज उमर, असलम अन्सारी, प्रा. रिजवान खान आदी सामील झाले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slogans raised against kirit somaiya in malegaon asj