नाशिक – स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपनी एपीरॉकतर्फे शहराजवळील गोंदे दुमाला परिसरात प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३५० कोटीहून अधिकची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास एपीरॉकच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेलेना हेडब्लॉम यांनी व्यक्त केला.

येथे पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देण्यात आली. हेडब्लॉम यांच्यासह एपीरॉक इंडियाचे अध्यक्ष अरूणकुमार गोविंदराजन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारतातील वाढणाऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या बाजारपेठेत आमची उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी नाशिकमधील नवीन केंद्र हा महत्वाचा टप्पा असून या ठिकाणी खाणकाम व बांधकाम ग्राहकांसाठी भूमिगत आणि जमिनीवरील उपकरणांची निर्मीती आणि संशोधन केली जाईल, असे हेडब्लाॅम यांनी सांगितले. या केंद्राचे काम २०२६ मध्ये सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये कंपनी १९९७ पासून काम करत असल्याने कंपनीच्या वेगवेगळ्या पथकांनी नाशिक पुढील प्रकल्पासाठी योग्य असल्याचे सांगितल्याने पहिल्या टप्प्यात ३५० कोटी हून अधिक रक्कम गुंतविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक येथील एपीरॉकच्या सध्याच्या मनुष्यबळात २०० लोकांची वाढ होणार आहे. स्थानिकांना त्यांच्यातील कौशल्यानुसार वाव देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

एपीरॉक इंडियाचे अध्यक्ष गोविंदराजन यांनी, राज्यात पहिल्यांदाच नाशिकमध्ये कंपनीतर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात इमारत विस्तारीकरण व त्यानंतर पुढील कामे होतील. खाण उत्पादनांशी संबंधित कामे केली जातील, असे त्यांनी नमूद केले.