जळगाव : चिन्ह मिळावे असे मला वाटत होते. ते आता नाही मिळाले. त्याचे दुःख आहेच. चिन्ह नसले तरी दसरा मेळाव्यातील गर्दी आणि आमच्याकडील लोकप्रतिनिधींची संख्या हेच सांगतेय की, शिंदे गटाची ताकद वाढलीय. धनुष्यबाण चिन्ह हे लोकांच्या मनात होते. त्यामुळे त्याचा फायदा कुणाला होईल, यापेक्षा आता दोन्ही गटांना जनतेच्या नजरेसमोर चिन्ह आणण्यासाठी, त्याच प्रकारच्या चिन्हाची आता निवड करावी लागणार आहे, असे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
हेही वाचा >>> ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतच्या निर्णयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रबोधनक ठाकरेंनी…”
हेही वाचा >>> जळगावमध्ये कोजागरी पौर्णिमेसाठी दीड लाख लिटर अतिरिक्त दूध वितरण
शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगातर्फे शनिवारी घेण्यात आला. शिवाय, या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गटांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. या निर्णयाबाबत पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, जनतेसमोर त्याच प्रकारच्या चिन्हाची निवड करावी लागणार आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळाले नसल्याचे दुःख आहेच. मात्र, तरीही ताकद ही आमचीच सर्वांत जास्त आहे, हे दसरा मेळाव्यातील गर्दीवरून दिसून येते. निवडणूक आयोगाचा हा तात्पुरता निर्णय आहे. त्यावर बोलणे योग्य नाही. रविवारी सायंकाळी सातला शिंदे गटातील आमदार, खासदारांची बैठक बोलाविण्यात आली. त्यासंदर्भातील निरोप आताच मिळाला आहे. मी आता रवाना होत आहे. या बैठकीत चिन्हाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह गोठविले. योग्य वेळी तह केला असता तर ही वेळ आली नसती. जनमताचा आदर म्हणून शिंदे गटालाच धनुष्यबाण चिन्ह मिळेलच, असा विश्वास व्यक्त करीत ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना नियोजन करता आले नाही. त्यांना समजूत काढणेही जमले नाही. याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणता येईल, अशी टीकाही केली.