मालेगाव : नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने तालुक्याबाहेर बदल्या झाल्या असतानाही मालेगाव तालुक्यातील २७ शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा तुघलकी निर्णय नाशिक जिल्हा परिषदेने घेतला आहे. या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास संबंधित शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त राहतील असे कारण त्यासाठी दिले गेले. परंतु , हा दावा खोटारडा आहे की, शिक्षण विभागाचे अज्ञान यात दडले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ३८३८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र ही प्रक्रिया पार पडल्यावर पावणे दोन महिने उलटल्यानंतरही संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करून बदली झालेल्या ठिकाणी हजर करून घेतले गेले नव्हते. जिल्हा परिषदेकडून होणाऱ्या या कालापव्ययामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिल्यावर अखेर गेल्या १५ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले.
या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील बदली झालेले शिक्षक लगेच कार्यमुक्त होऊन नव्या शाळांमध्ये हजर झाले. परंतु मालेगाव तालुक्यामधून अन्य तालुक्यांमध्ये बदली झालेल्या २७ शिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशास लागलीच स्थगिती देण्यात आली. संबंधित शिक्षक असणाऱ्या शाळांवर त्यांच्या बदलीनंतर रिक्त पदे राहत असल्याने तेथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ,नये यासाठी या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा सूर ही स्थगिती देताना लावण्यात आला. जिल्ह्यामधील अन्य १४ तालुक्यांमध्ये हा निकष न लावता केवळ मालेगाव तालुक्यातच हा निकष लावल्याने त्या विरोधात नाराजी उफाळून आली. या निर्णयामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या तालुक्याला वेगळा न्याय का, असा प्रश्न देखील उपस्थित केला गेला.
महत्त्वाचे म्हणजे बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास संबंधित शाळांमधील पदे रिक्त राहतील हा जो दावा शिक्षण विभागाकडून केला गेला त्याच्यातही तथ्य नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर येत आहे. त्यासाठी मालेगाव तालुक्याच्या धुळे जिल्हा हद्दीला लागून असलेल्या कजवाडे व पोहाणे या दोन गावांमधील शाळांचे वाणगीदाखल उदाहरणे बघितल्यास शिक्षण विभागाचे अज्ञानच दिसून येत आहे. कजवाडे येथे शिक्षकांची एकूण ८ पदे मंजूर आहेत. बदली प्रक्रिया राबवण्यापूर्वी तेथे ६ शिक्षक कार्यरत होते. त्यातील तिघांची अन्यत्र बदली झाली आणि बाहेरून बदलीने या शाळेवर ५ शिक्षक आले.
बदली झालेल्या तिघांपैकी तालुक्यात बदली झालेल्या एका शिक्षकाला कार्यमुक्त करण्यात आले परंतु तालुक्याबाहेर गेलेल्या दोघा शिक्षकांची कार्यमुक्ती रोखण्यात आली. त्यामुळे या शाळेवर एकूण ८ मंजूर पदे असताना आजच्या घडीला तेथे शिक्षकांची संख्या १० झाली आहे. शेजारच्या पोहाणे येथे देखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या शाळेवर कार्यरत असलेल्या ७ पैकी ६ शिक्षकांची अन्यत्र बदली झाली. बाहेरून ७ शिक्षक आले. बदली झालेल्या ६ पैकी तालुक्याबाहेर बदली झालेल्या दोघांची कार्यमुक्ती रोखण्यात आली. त्यामुळे या शाळेतील एकूण शिक्षक संख्या आता १० झाली आणि तेथील मंजूर पदांची संख्या ९ इतकी आहे. त्यामुळे याला शिक्षण विभागाचे अज्ञान म्हणावे, खोटारडेपणा म्हणावे की आणखी काही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.